चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रातल्या प्रचाराचा नारळ वाढवला. त्यांनी चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचाराची सभा घेतली. सभेत त्यांनी उबाठा शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. काँग्रेस सोबत आहे ती नकली शिवसेना असल्याचे सांगत बाळासाहेब ठाकरेंचं उदाहरण देऊन त्यांनी काँग्रेसविरोधात ते कसे उभे राहिले होते हेदेखील त्यांच्या भाषणात स्पष्ट केले.
उद्यापासून गुढीपाडवा नवं पर्व सुरु होतं आहे. सगळ्या बंधू भगिनींना गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. २०२४ लोकसभा निवडणूक हा स्थैर्य आणि अस्थिरता यांच्यातला लढा आहे. एकीकडे भाजपा आणि एनडीए आहे. भाजपा आणि एनडीए देशासाठी महत्त्वाचे निर्णय घेते आहे. दुसरीकडे आहे काँग्रेस आणि त्यांची इंडी आघाडी. सत्ता भोगा आणि मलई खा हे त्यांचं ध्येय आहे. एक स्थिर सरकार किती आवश्यक असतं हे महाराष्ट्राशिवाय आणखी कुणाला जास्त समजणार? जोपर्यंत देशात देशात त्यांचं (इंडी आघाडी) सरकार होतं, महाराष्ट्राची उपेक्षाच होत राहिली असा आरोप नरेंद्र मोदींनी केला.
काँग्रेस पक्षाने स्व कर्माने पाठिंबा गमावला आहे. काँग्रेस आता फोडा आणि राज्य करा हे धोरण अवलंबलं आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मुस्लीम लीगची भाषा आहे. हे देश स्वीकारणार आहे का? असा प्रश्न उपस्थित केला. “काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणाले मोदी देशात जिथे कुठे जातात तिथे काश्मीरबाबत का बोलतो? हा फाळणीचा विचार नाही का? छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्लीविरोधात भूमिका घेतली तेव्हा ते म्हणाले का दिल्लीत जे होतंय त्याचा माझा काय संबंध? लोकमान्य टिळक म्हणाले होते का की जालियनवाला बाग हत्याकांड आणि माझा काय संबंध? काश्मीरमध्ये जेव्हा काश्मिरी पंडितांची घरं जाळण्यात आली तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेसच्या विरोधात उभे राहात भूमिका घेतली होती. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे असं नाही म्हणाले की काश्मीरमध्ये आग लागली आहे तर महाराष्ट्रातल्या लोकांचा काय संबंध? मला आनंद आहे की एकनाथ शिंदेंची शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे घेऊन जात आहे.” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.