Jalgaon Nesw: बामणोदच्या महिला मंडळा अधिकार्‍यांना मारहाण

यावल ः जळगाव जिल्ह्यात वाळू माफियांना यंत्रणेचा धाक उरला नाही, अशी स्थिती निर्माण झाली असून महसूल कर्मचार्‍यांवर हल्ले सुरूच आहे. कठोर कारवाई केली जात असताना विरोध करण्यासाठी थेट आता महिला अधिकार्‍यांवरच हात उचलला जात असल्याने महसूल कर्मचारी संतप्त झाले आहेत यावल तालुक्यातील बामणोद येथील महिला मंडळ अधिकार्‍यांना गुरुवारी साकळी-शिरसाड परीसरात अवैध वाळू वाहततुकीवर कारवाई करताना वाळूमाफियाने दमदाटी व शिवीगाळ करीत धक्काबुक्की केल्याचा संतापजनक प्रकार घडला तर वाळू माफियांनी त्यानंतर तेथून ट्रॅक्टर घेत पळ काढल्याची  घटना घडली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात वाळूमाफियाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तालुक्यातील ही दुसरी घटना आहे. यामुळे महसूल यंत्रणेत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

वाळू माफियांवर कठोर कारवाईची मागणी

यावल तालुक्यातील बामणोद येथील महिला मंडळ अधिकारी बबिता चौधरी यांची  गुरुवार, 31 ऑगस्ट रोजी साकळी, शिरसाड परीसरात वाळूसाठा देखरेखीसाठी पर्यवेक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. तेथे जात असताना रस्त्यात अवैध वाळू वाहतूक करीत असताना ट्रॅक्टर दिसून आल्याने त्यांनी ट्रॅक्टर चालकाला थांबवीत वाळू वाहतुकीचा परवाना आहे किंवा नाही, याबाबतची माहिती घेतली असता चालकाने कुणालातरी फोन लावताच दोघे आले. यावेळी मंडळ अधिकारी बबिता चौधरी हे ट्रॅक्टरवर बसल्याचे पाहून दोघा अनोळखींनी हुज्जत घालती व ट्रॅक्टर खाली ओढल्याने मंडळाधिकारी जमिनीवर पडून किरकोळ जखमी झाल्या व संशयितांनी यावेळी शिविगाळ करीत ट्रॅक्टर पळवून नेले. साकळी मंडळात वाळू माफियांकडून मंडळ अधिकार्‍यावर हल्ला करण्याची ही दुसरी घटना घडल्याने महसूल कर्मचारी संतप्त झाले आहेत. शासकीय काम कसे करावे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

वाळू माफियाविरोधात गुन्हा

मंडळ अधिकारी बबिता सुधाकर चौधरी (45, यावल) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल येथील पोलीस ठाण्यात वाळू माफिया निलेश समाधान सोनवणे (थोरगव्हाण, ता,यावल) व दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, यावल तालुक्यात सर्वाधिक साकळी आणि बामणोद मंडळात तापी नदी किनारपट्टीवरून अवैध गौण खनिज उत्खनन, वाहतूक व उपसा केला जातो. या वाळूमाफियांना अभय  कुणाचे आहे? याबाबत आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. वाळूमाफियांची हिंमत, दादागिरी दिवसेंदिवस वाढत आहे. तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन, उपसा व वाहतूक करणार्‍यांची नावे आणि वाहनांसह चौकशी करून यादी करून प्रांताधिकारी, यावलचे तहसीलदार, यावल पोलीस ठाणे यांनी संयुक्त कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.