लष्कराचे बंकर आणि संरक्षण आश्रयस्थानांच्या बांधकामात पारंपरिकरीत्या वापरल्या जाणारे लाकूड, लोखंड आणि इतर घटकांची जागा घेऊ शकेल, असे बांबू आधारित मिश्रण भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) गुवाहाटीने तयार केले आहे.
धातूच्या घटकांइतकीच वाकण्याची शक्ती या बांबूच्या मिश्रणात आहे. केवळ इतकेच नव्हे, तर त्याला बंदुकीची गोळीही भेदू शकत नाही. म्हणजेच ते बुलेटप्रुफही आहे. आयआयटी गुवाहाटीने विकसित केलेल्या बांबूच्या या मिश्रणाच्या भारतीय लष्कराकडून चाचण्या घेतल्या जात आहेत.
आयआयटी गुवाहाटी येथे सुरू झालेल्या स्टार्ट-अप ॲडमेका कंपोझिट्स प्रा. लि. ने प्रयोगशाळेत बांबू-आधारित संमिश्र घटक तयार केले आहेत आणि त्यांच्या यांत्रिक गुणधर्मांची चाचणी केली आहे. या चमूने प्रथमच बांबूच्या पट्ट्या आणि इपॉक्सी रेझिन वापरून आय-सेक्शन बीम आणि फ्लॅट पॅनेलसारखे सहा फूट स्ट्रक्चरल घटक विकसित केले. उत्कृष्ट ताकद तसेच वस्तू गुणोत्तरामुळे ग्लास फायबर, कार्बन फायबर आणि सँडविच संमिश्राचा वापर एरोस्पेस, नागरी आणि नौदल क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर केला जातो. परंतु, त्यांच्या उत्पादन आणि विल्हेवाटीदरम्यान ते महत्त्वपूर्ण पर्यावरणीय आव्हाने निर्माण करतात. वृक्षतोडीवर वाढत्या निर्बंधांमुळे आणि हिरव्या पर्यायांसाठी जागतिक स्तरावर होत असलेल्या प्रयत्नांमुळे आयआयटी गुवाहाटी संशोधक बांबू आधारित संमिश्रांचा एक व्यवहार्य पर्याय म्हणून शोध घेत आहेत, असे आयआयटी गुवागाटी येथील प्रा. पूनम कुमारी यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.
बांबू जलद वाढीच्या दरासाठी आणि अक्षय्य निसर्गासाठी ओळखला जातो. तो चार ते पाच वर्षांत परिपक्व होतो. त्या उलट साल किंवा सागवानासारख्या पारंपरिक झाडांना परिपक्व होण्यासाठी जवळपास ३० वर्षे लागतात. हे हलके, पर्यावरणपूरक, स्थानिक पातळीवर उपलब्ध आहे आणि ऐतिहासिकदृष्ट्या फर्निचर, झोपड्या आणि एकमजली कॉटेजसाठी वापरले जाते.
सुरुवातीच्या चाचण्यांमध्ये असे दिसून आळे की, या बांबूच्या संमिश्रांमध्ये धातूच्या घटकांइतकीच वाकण्याची शक्ती आहे. परंतु, ते सौंदर्यदृष्ट्या आकर्षक आणि लक्षणीयरीत्या हलके आहेत, असे कुमारी म्हणाल्या. बांधकाम आणि संरक्षण क्षेत्रात व्यावसायिक वापर व्हावा यासाठी बांबू मिश्रणाच्या पॅनल्सची मजबुती अधिक प्रमाणात वाढवण्यासाठी संशोधन पथक आता काम करीत आहे.
संरक्षण प्रयोगांसाठी यशस्वी चाचणी
बांबूचा वापर करून संरचना केलेल्या सँडविच कंपोझिट ब्लॉकची बंकर संरक्षणासह इतर संरक्षण प्रयोगांसाठी यशस्वी चाचणी घेण्यात आली. कंपोझिट पॅनल्सने जड भारांखाली (२०० किलो पर्यंत) उल्लेखनीय लवचिकता दाखवली आणि गोळीबाराच्या चाचणीही यशस्वी केली. यामुळे लष्करी संरचनांमध्ये वापरण्याची त्यांची क्षमता दिसून येते.
आमचे ध्येय पारंपरिक साहित्यांना पर्यावरणपूरक, उच्चशक्ती पर्याय देणे आहे. बांबू संमिश्र केवळ लाकूड आणि धातूंवरील अवलंबित्व कमी करीत नाहीत, तर स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या अक्षय संसाधनांचा वापर करून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही आधार देतात.
प्रा. पूनम कुमारी, आयआयटी गुवाहाटी