---Advertisement---
वॉशिंग्टन : पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी फील्ड मार्शल सय्यद असीम मुनीर यांची देशाचे पहिले संरक्षण दल प्रमुख म्हणून नियुक्ती केली. या निर्णयाने मुनीर यांना राष्ट्रपतींच्या समांतर अधिकार मिळाल्याने हा लोकशाहीसाठी मोठा धोका असून, मुनीर यांना अमेरिकेत प्रवेशबंदी घालून त्यांची मालमत्ता गोठवा, अशी मागणी करणारे पत्र ४० हून अधिक अमेरिकन खासदारांनी परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांना पाठविले आहे.
मुनीर यांना लष्करप्रमुख आणि संरक्षण दल प्रमुख नियुक्त करण्याची पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केलेली शिफारस गुरुवारी राष्ट्रपती झरदारी यांनी मान्य केली. यामुळे पुढील पाच वर्षे एकाच वेळी दोन्ही पदांवर मुनीर कायम राहणार आहे. याविरोधात ४४ अमेरिकन खासदारांनी रुबियो यांना पत्र लिहून मुनीर हे लोकशाहीसाठा धोकादायक असून, त्यांना अमेरिकेत प्रवेश देऊ नये अशी मागणी केली. पत्रात पुढे म्हटले की, लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या नियंत्रणाखालील पाकिस्तानी सरकार उघडपणे दडपशाही धोरणे राबवत आहे.
लोकांचा आवाज दडपला जात आहे आणि लष्करी राजवटीला आव्हान देणाऱ्यांना तुरुंगात डांबले जात आहे. काही उच्चपदस्थ अधिकारीही या दडपशाहीत सामील आहेत. पाकिस्तान हुकूमशाहीच्या उंबरठ्यावर असून, यासाठी जबाबदार असलेल्या मुनीरसारख्या लोकांवर व्हिसा बंदी आणि मालमत्ता गोठवण्यासारखे उपाय करायला हवेत. पत्र लिहिणाऱ्यांमध्ये अमेरिकन काँग्रेस महिला प्रमिला जयपाल, रशिदा तालिब आणि ग्रेग कैसर यांचा समावेश आहे.
विरोध करणाऱ्यांचा अतोनात छळ
पत्रात म्हटले की, पाकिस्तानमध्ये हुकूमशाही अत्याचारांविरुद्ध बोलणाऱ्या अमेरिकन नागरिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना धमक्या आणि छळाचा सामना करावा लागत आहे. त्यांना मनमानीपणे ताब्यात घेतले जात आहे. या घटना नागरी आणि राजकीय हक्क नियंत्रित करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करतात. लोकशाही संस्था आणि मूलभूत स्वातंत्र्ये पद्धतशीरपणे नष्ट केली जात आहेत.









