---Advertisement---
जळगाव : रावेर तालुक्यात यंदाचा खरीप हंगाम पावसाअभावी गंभीर संकटात सापडला आहे. आषाढ महिन्याच्या शेवटीस पर्जन्य नक्षत्र संपत आले असतानाही, आतापर्यंत केवळ १७ टक्के पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये पेरण्या उशिरा झाल्या आहे. ज्यांनी पेरणी केली, त्यांचीही पिके आता सुकू लागली आहेत.
ज्वारी, मका, उडीद, मूग, सोयाबीन, भुईमूग, कपाशी अशा पारंपरिक खरीप पिकांची उगम आणि वाढ होण्याचा टप्पा असून, त्यासाठी सतत आर्द्रता आवश्यक असते. मात्र, पावसाचा खंड सुरूच असल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. काही भागांत तर पुन्हा पेरणी करावी लागण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर महसूल आणि कृषी विभागाने खरीप हंगामाचा आढावा घ्यावा, शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, अशी मागणी केली जात आहे.
न्हावी परिसरात पावसाने दडी
यावल तालुक्यातील न्हावी तसेच परिसरातील अनेक गावांमध्ये यंदा पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगामावर गंभीर परिणाम झाला आहे. वेळकाढूपणा करत आलेल्या पावसामुळे पेरण्या उशिराने करण्यात आल्या. मात्र पेरणीनंतर पुन्हा पावसाने दडी मारल्याने पिके करपायला लागली आहे.
गावागावांत ज्वारी, मका, सोयाबीन, कपाशी, उडीद, मूग आणि भुईमूग यांसारख्या पिकांची पेरणी झाली होती. मक्याची पेरणी सर्वाधिक प्रमाणात करण्यात आली आहे. मात्र गेल्या कित्येक दिवसांपासून पावसाचा एक थेंबही न पडल्याने पिके मरगळली आहेत.