मराठी सेनेचे मोहनिश राऊळ यांनी “बंधू मिलन” कार्यक्रमाचं आयोजन गुढीपाडव्याच्या दिवशी केला आहे. यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन बंधूंनी गुढीपाडव्याच्या दिवशी बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र यावं, अशी विनंती निमंत्रण देऊन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना केली जाणार आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र यावे यासाठी आता मुंबईतील मराठी सेना अॅक्शन मोडमध्ये आली आहे. येत्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने ठाकरे बंधू मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मुंबईत हा कार्यक्रम पार पडणार आहे.
यापूर्वी मराठी सेना पक्षाने दादर सेना भवन परिसरात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे अशा आशयाचे बॅनर लावले होते. त्यानिमित्ताने आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर निमंत्रण पत्रिका ठेवली आहे.
निमंत्रण पत्रिकेत नेमकं काय म्हटलंय?
बंधू मिलन निमंत्रण, भाऊ माझा आधार, माझ्या ध्येयाचा किनारा, आयुष्याच्या प्रत्येक सुख दुःखाचा सोबती, भाऊ माझ्या जीवनाचा आधार. बंधू मिलन कार्यक्रम दिनांक 30 मार्च 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज मैदान मुंबई येथे सकाळी ११ वाजता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाजवळ घेण्याचे योजिले आहे. मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येण ही काळाची गरज आहे, तरी आपली उपस्थिती वंदनीय असेल, असे या निमंत्रण पत्रिकेत म्हटलं आहे.
