---Advertisement---
भाभा अणू संशोधन केंद्राने (बीएआरसी) २०० मेगावॉट क्षमतेची अणुभट्टी तयार केली आहे. ही अणुभट्टी एस-५ क्लासच्या अणुपाणबुडी आणि अणुहल्ला करणाऱ्या पाणबुडीत (प्रोजेक्ट ७७) वापरली जाईल. यामुळे पाणबुडीची शक्ती दुप्पट होईल. सध्या भारताकडे आयएनएस अरिहंत आणि आयएनएस अरिघात या दोन अणुपाणबुड्या आहेत. त्यात ८३ मेगावॉटच्या अणुभट्ट्या आहेत. तिसरी अणुपाणबुडी अरिधमनच्या सध्या चाचण्या सुरू आहेत. यातील अणुभट्ट्या लहान क्षमतेच्या आहेत.
त्यामुळे त्या दीर्घकाळापर्यंत पाण्यात राहू शकत नाहीत. त्यांची टिकून राहण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे मोहिमांचा कालावधीही कमी होतो. नवीन अणुभट्टी २०० मेगावॉटची आहे. म्हणजे ही दुप्पट शक्ती देईल. यामुळे पाणबुडी दीर्घकाळापर्यंत पाण्यात राहू शकते आणि मोठ्या मोहिमा पार पाडू शकते.
एस-५ क्लासच्या पाणबुड्या भारताची ताकद
एस-५ क्लास भारताच्या पुढील पिढीतील बॅलेस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी आहे. ती अरिहंत क्लासच्या दुप्पट मोठी असेल. यात १२ ते १६
आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे राहतील. त्यात के-५, एसएलबीए ही पाच हजार किमी मारा करणारी क्षेपणास्त्रे राहतील. प्रोजेक्ट ७७हल्ला करणारी पाणबुडी असून, ती शत्रूच्या नौकांचा वेध घेईल. नवीन अणुभट्टी या पाणबुड्यांना वेग, लांब पल्ल्यापर्यंत लपून राहण्याची क्षमता देईल. चीनच्या वाढत्या शक्तीला उत्तर देण्यासाठी हे आधुनिकीकरण करण्यात आले. चीन वेगाने बळकट पाणबुड्यांची निर्मिती करी असल्याने भारतालाही ते आवश्यक झाले आहे.
न्युक्लिअर ट्रायडचे महत्त्व
भारताचे न्युक्लिअर ट्रायड तीन भागांत आहे. लष्कर (जमिनीवरून हल्ला करणारी क्षेपणास्त्रे), वायुदल (हवेतून मारा करणारी) आणि नौदल (पाण्यातून मारा करणारी) त्यात पाणबुडी ही सर्वाधिक सुरक्षित असते. पाणबुडी खोल समुद्रात लपून प्रतिहल्ला करू शकते. शत्रू सहजासहजी नष्ट करू शकत नाही. अणुशक्ती वाढावी म्हणून सरकार एस-५ आणि प्रोजेक्ट ७७ वर लक्ष केंद्रित करीत आहे.