Bird flu: चिकन खात असला तर सावधान ! या जिल्ह्यात ‘बर्ड फ्ल्यू’चा कहर

#image_title

Raigad : राज्यात पुन्हा एकदा बर्ड फ्ल्यूने डोकं वर काढलं आहे. ठाण्यानंतर आता रायगड जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा कहर वाढला आहे. रायगड जिल्ह्यातील  उरण तालुक्यातील चिरनेर येथील बर्डफ्ल्यूचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे रायगड जिल्हाधिकाऱ्यांन पोल्ट्री फॉर्ममधील मृत कोंबड्याचे नमूने पुणे आणि भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठविले होते. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.  यातील काही कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूने झाल्याचं आढळून आलं. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

चिरनेर परिसरातील हजारो कोंबड्या आणि अंडी नष्ट करण्यात आली आहेत. तसेच चिरनेर परिसरातील 10 किलोमीटर अंतरावरील सर्व गावांना त्यांच्याकडील कोंबड्या आणि त्यापासून मिळालेली अंडी नष्ट करण्याचे आदेशच जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

कोंबड्यांना बर्ड फ्ल्यूची लागण झाल्यानंतर हजारो कोंबड्या आणि अंडी नष्ट करण्यात आली. त्यानंतर ग्राहकांनी कोंबडी आणि अंडी खरेदी करण्यासाठी पाठ फिरवल्याने चिकन विक्रेते आणि कुक्कुटपालन व्यावसायिकांवर मोठं आर्थिक संकट ओढावलं आहे. तर, नागरिकांनी सतर्क राहावं, अधिक दक्षता घ्यावी, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.

चिरनेर परिसरात निर्जंतुकीकरण

बर्ड फ्ल्यू वाढू नये म्हणून केंद्र सरकारने 10 टीम तैनात केल्या होत्या. त्याशिवाय चिरनेर परिसरात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात येत आहे. त्याशिवाय इतर सुविधाही पुरविण्यात आल्या आहेत. तसेच या भागात दोन टीम तैनात ठेवल्या आहेत. चिरनेर आणि आजूबाजूच्या परिसरावर पुढचे तीन महिने लक्ष ठेवलं जाणार आहे. त्यासाठी या भागात तीन महिने पथक तैनात राहणार आहे, असं पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. सोमनाथ भोजने यांनी सांगितलं.

नुकसान भरपाईची मागणी

ब्लड फ्लूमुळे चिरनेर गावात भीतीचे वातावरण आहे.  या घटनेमुळे  पोल्ट्री व्यवसाय कोलमडला आहे. आम्हाला आर्थिक डबघाईचा सामना करावा लागणार आहे. आमच्या नष्ट करण्यात आलेल्या कोंबड्यांची भरपाई करण्यात यावी. ही भरपाई तात्काळ करण्यात यावी, अशी मागणी पोल्ट्री व्यावसायिकांकडून केली आहे.