पिण्याच्या पाण्याची होणार तपासणी

 तरुण भारत लाईव्ह न्युज नंदुरबार : ग्रामीण भागात ग्रामस्थांना शुद्ध, स्वच्छ’ नियमित प्रती दिन 55 लिटर पिण्याचे पाणी मिळावे यासाठी पाणीपुरवठा योजनांच्या स्त्रोतांचे जिओ टॅगिग केले जाणार आहे. पाणी स्रोतांचे रासायनिक व जैविक तपासणीसाठी 1 ते 31 डिसेंबर दरम्यान जिल्ह्यात स्वच्छ जल से सुरक्षा हे अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली.
स्वच्छ जल से सुरक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व नळ पाणीपुरवठा योजनांचे सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे पाणीपुरवठा योजनेचे स्रोतांचे केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार मान्सून पश्चात रासायनिक व जैविक तपासणी करण्यात येणार आहे. या अभियानात पाणी तपासणी ही ग्रामस्तरावर निवड करण्यात आलेल्या पाच महिलांद्वारे करण्यात येणार आहे. पाणी तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर या महिलांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे .

पिण्याच्या पाण्याची तपासणी ही फिल्ड टेस्ट किटद्वारे तसेच प्रयोग शाळेत देखील करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हास्तरावरून रासायनिक तपासणीसाठी 602 टेस्ट किट तर जैविक तपासणीसाठी 16046 फील टेस्ट किट पुरविण्यात येणार आहेत. तसेच जल सुरक्षकांमार्फत पाणी नमुने एकत्रित करून सदर नमुने तपासणीसाठी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाच्या उपविभागीय व जिल्हास्तरीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. अभियानात जिल्ह्यातील एकूण 7 हजार 673 स्रोतांची फील्ड टेस्ट किटद्वारे तसेच उपविभागीय जिल्हा पाणी गुणवत्ता प्रयोगशाळेत पाण्याची तपासणी करण्यात येणार
आहे .

स्वच्छ जल से सुरक्षा अभियानात जिल्ह्यातील सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी, बहुविध आरोग्य सेवक, सेविका, ग्रामसेवक जल सुरक्षक यांनी सहभागी व्हावे व अभियान यशस्वी करावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे , उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, वरिष्ठ भूवैज्ञानिक बगमार, जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक जयवंत उगले, जिल्हा आरोग्य अधिकारी गोविंद चौधरी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय बाविस्कर यांनी केले आहे.