रावेर : येथे सामाजिक कार्यक्रमांत रागाने का बघतो म्हणत एक जण दुसऱ्याच्या अंगावर धावूनगेला. यावेळी डोक्यात लोखंडी वस्तूने हल्ला करत जखमी केले. ही घटना १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली असून सावदा पोलिसांत एका विरोधात गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सावदा येथे पिंपरुड रोड वर रविवारचा बाजार भरतो. या बाजारपट्टा परिसरात बुधवार रोजी धार्मिक कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. या कार्यक्रमात सय्यद मोईन सय्यद सलीम (वय २४ वर्ष, रा. मोठा आखाडा. सावदा) हा देखील आला होता. तसेच हैदर शेख मंजूर, (रा. मोठा आखाडा, सावदा) हा देखील आला होता.
यावेळेला हैदर शेख मंजूर याने सैय्यद मोईन याच्याकडे रागाने पाहिले. सय्यद मोईन याने हैदर शेख याला याचा जाब विचारला. त्याचवेळी हैदर शेख हा हातात लोखंडी वस्तू घेवून सैय्यद मोईन याच्या आंगावर धाऊन गेला. हैदर शेखने रागात सय्यद मोईन याच्या डोक्यात लोखंडी वस्तू मारली. यात सय्यद गंभीर जखमी झाला. सय्यद मोईन याने दिलेल्या फिर्यादीवरून सावदा पोलिस ठाण्यात हैदर शेख मंजूर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. सानप हे करीत आहे.
दरम्यान, जखमी तरुण सय्यद मोईन याला उपचारार्थ प्रथम सावदा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करून नंतर पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे.