दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात ,गोलाणी मार्केटमध्ये साचले पाणी!

जळगाव, 10 जुलै

शहरातील नावाजलेले आणि सर्व विषयांनी सोयीचे असलेल्या गोलाणी मार्केटच्या बेसमेंटला सतत दोन दिवस झालेल्या पावसामुळे तलावाचे स्वरूप आले आहे. यामुळे या मार्केटमधील दुकानदारही त्रस्त झाले आहेत.

शहरात स्वच्छता मोहिमेचा डंका वाजवणारी जळगाव महानगरपालिकेच्या परिसरात असलेले गोलाणी मार्केटमधील बेसमेंटमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. या पाण्याला निघण्यासाठी कुठेच जागा नाही. यामुळे हे पाणी गेल्या दोन ते तीन दिवसांपासून एकाच जागी साचले आहे. यामुळे बेसमेंटमध्ये असलेल्या जवळपास शंभर दुकानदारांना याचा त्रास होत आहे. यामुळे परिसरात रोगराई पसरण्याचीही शक्यता आहे. या मार्केटच्या बेसमेंटमध्ये नियमित साफसफाई होत नाही. शिवाय याचठिकाणी भाजी मार्केटही आहे. त्यामुळे या अस्वच्छ पाण्यापासून जन्माला आलेल्या जीव जंतूंचा वास याच भाज्यांवर होतो. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होतो.

पाणी काढण्याची मागणी

मार्केटच्या बेसमेंट मध्ये जमलेल्या पावसाचये पाणी महापालिकेने मशीनद्वारे बाहेर काढून हा परिसर स्वच्छ करावा किंवा या पाण्यावर फवारणी करावी जेणे करून यापाण्यातून रोगराई जन्माला येणार नाही, अशी मागणी आता दुकानदार करत आहे.

दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात 

शहरात स्वच्छता अभियान राबवून, कचरामुक्त करण्याचा चंग उराशी बांधणार्‍या जळगाव शहर महानगरपालिकेच्या दिव्याखालीच अंधार आहे. मनपाच्या स्वमालकीच्या इमारतीतच बाहेर एक लिंबाचे झाड आहे. याच झाडाजवळ खाली उतरण्याचा मार्ग आहे. या ठिकाणी मनपाचे निकामी साहित्य ठेवले जाते. त्याच ठिकाणी मनपात दर्शनीभागात लावलेल्या पथदिव्यांचे कव्हर ठेवण्यात आले आहे. हि कव्हर अशा पद्धतीने ठेवण्यात आले आहे, की पावसाचे पडलेले पाणी पद्धतशीररित्या त्यात संकलित होते. यामुळे याठिकाणी पाणी साचून, डासांची उत्पत्ती होऊन, आजाराला निमंत्रण मिळत आहे. यामुळे या भागात स्वच्छता मोहीम राबवून मनपाने दिव्याखालचे अंधार दूर करण्याची मागणी होत आहे.