गोवंश हत्येचा अड्डा बनतोय नशिराबाद? वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह

---Advertisement---

 

नशिराबाद शहरात गोवंश मांस आढळण्याच्या घटनांनी पुन्हा एकदा नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वी ३० डिसेंबर रोजी तब्बल ८० किलो गोवंश मांस जप्त करण्यात आले असतानाच, ४ जानेवारी २०२६ रोजी पुन्हा एकदा अशीच घटना उघडकीस आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

नशिराबाद येथील मन्यार मोहल्ला परिसरात सईद चुनीवाले यांच्या बंद घरासमोर सार्वजनिक ठिकाणी सुमारे ३० किलो वजनाचे गोवंश मांस आणि एक लोखंडी कोयता पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे जप्त केला. या प्रकरणी जाबीर खान अय्याज खान कुरेशी (वय २८, रा. रहिमतपुरा, नशिराबाद) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ केदार बारबोले तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रशांत विरणारे करीत आहेत.

राज्यात गोवंश हत्येवर कायदेशीर बंदी असतानाही नशिराबादमध्ये वारंवार गोवंश मांस सापडणे ही गंभीर बाब मानली जात असून, यामुळे गोरक्षक संघटनांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, नशिराबाद परिसरात शेतकऱ्यांच्या गायी-बैल चोरीच्या घटनांमध्येही वाढ झाल्याचे चित्र आहे. मात्र अद्याप एकाही चोरीच्या प्रकरणाचा छडा लागलेला नाही. त्यामुळे गोवंश मांस प्रकरणातील आरोपींचाच या चोरींशी काही संबंध आहे का, असा संशय शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

अशा घटना पुन्हा पुन्हा घडत असताना प्रशासन केवळ कारवाईपुरतेच मर्यादित राहणार का, असा सवाल आता नागरिक विचारत आहेत. या सर्व प्रकरणांचा सखोल तपास करून मुळापर्यंत जाणे आणि कायमस्वरूपी तोडगा काढणे आवश्यक असल्याची ठाम मागणी नागरिक व शेतकरी वर्गाकडून पोलीस प्रशासनाकडे केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---