पुणे : अल्पवयीन मुलीवर मैत्रणीच्या मित्रांनी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरुन समर्थ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका अल्पवयीन तरुण आणि इतर मित्रांवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा सगळा धक्कादायक प्रकार एप्रिल महिन्यात घडला आहे. पीडित तरुणीच्या आणि तिची मैत्रीण दोघी घराजवळ राहत असल्याने त्यांची पूर्वीपासून ओळख होती. संशयित मैत्रिण हिने पीडित तरुणी हिला सोबत घेऊन तिच्या मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी नेले. या पार्टीला मैत्रिणीने तिच्या मित्रांना देखील बोलवले होते.
पार्टीच्या ठिकाणी पोहचल्यावर पीडित तरुणीला तिच्या मैत्रिणीने जबरदस्तीने तिला दारू पाजली. यानंतर तिच्या मित्रांनीच तिच्यावर अत्याचार केला. दारूच्या नशेत असलेल्या पीडित तरुणीला या घटनेबाबत कोणतीच कल्पना नव्हती. याचा गैरफायदा घेत एका तरुणाने या ठिकाणी या घटनेचा व्हिडिओ देखील मोबाईलवर रेकॉर्ड केला.
चार महिन्यानंतर पीडित तरुणीच्या वागणुकीत बदल दिसू आला. कुटुंबीयांनी याबाबत तिला प्रश्न विचारला असता हा सगळा प्रकार उघड झाला. पिडीत तरुणीच्या वडिलांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. यावरून समर्थ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका अल्पवयीन तरुण आणि इतर मित्रांवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.