तरुणभारत लाईव्ह न्यूज धानोरा :येथील अंकलेश्वर-बर्हाणपूर या राज्य महामार्गावर वसलेल्या धानोरा गावात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून चोर्यांचे सत्र सुरू आहे. ते थांबण्याचे नाव घेत नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वीच धानोरा येथील एक बियरबार, एक सिमेंट दुकान, एक बियर शॉप फोडल्याची घटना ताजी असतानाच 3 रोजी रात्री पुन्हा एकदा एकाच शेतकर्याच्या तीन म्हशी चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे.
हॉटेल प्रशांत कुलूप कुदळीच्या साह्याने तोडून गल्ल्यातील 2 हजार रुपये, 16 हजार रुपये किमतीचा डीव्हीआर तसेच येथील बाजूला असलेल्या सिमेंट दुकानातील रोख रक्कम 20 हजार रुपये तसेच जळगाव रोड रोडवरील पारस बिअर शॉपमधील 11 हजार रुपये किमतीचा डीव्हीआर तसेच दोन-अडीच हजार रुपयांची चिल्लर चोरून नेल्याची घटना घडली. पुन्हा एकदा येथीलच जितेंद्र गोकुळ चौधरी यांच्या खळ्यात बांधलेल्या त्यांच्या मालकीच्या तीन म्हशी अज्ञात चोरट्याने रात्री चोरून नेल्या. या शेतकर्याचे सुमारे 2 लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, धानोरासह परिसरात आणि शेती शिवारात विविध चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. याबाबत शेतकर्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या चोर्यांचे सत्र थांबवावे, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.