जळगाव: राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल राधाकृष्णजवळ विरूद्ध बाजूने आलेली भरधाव दुचाकी ईको वाहनावर आदळून झालेल्या अपघातात मलकापूर येथील तरुण जागीच ठार झाला तर सहकारी मित्र गंभीर जखमी झाला. हा अपघात शुक्रवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास घडला. अपघातामुळे काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली. बाजारपेठ पोलिसांसह शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली तर मृतदेह ट्रामा सेंटरला शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला. दरम्यान, अपघातात शेख फारूक शेख युसूफ (27, फातेमा नगर, मलकापूर) या तरुणाचा मृत्यू झाला तर राजेंद्र साळुंखे (33, मलकापूर) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.
भरधाव दुचाकी आदळून अपघात
मलकापूर येथील रहिवासी व रोलिंग शटर बनवून कुटूंबाला हातभार लावणारा तरुण शेख फारूक शेख युसूफ (27, फातेमा नगर, मलकापूर) हा मित्र राजेंद्र साळुंखे (33, मलकापूर) सोबत मलकापूर येथून भुसावळ येथे व्यावसायासाठी लागणारे साहित्य घेण्यासाठी भुसावळात दुचाकी (एम.एच.28 यु.9323)ने येत असताना जळगावकडून बोदवडच्या दिशेने श्रीकृष्ण छगन पारधी (ऐनगाव, ता.बोदवड) हे इको (एम.एच.19 डीव्ही.1180) घेवून जात असताना धडक झाल्याने दुचाकीस्वारासह दोघे रस्त्याच्या कडेला फेकले गेले. अपघातात जबर धडक बसल्याने शेख फारूक हा तरुण जागीच ठार झाला तर साळुंखे हा जखमी झाला. बाजारपेठ पोलिसांच्या माहितीनुसार, दुचाकीस्वार विरुद्ध दिशेने आल्याने हा अपघात घडला. अपघाताची माहिती कळताच पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, सहाय्यक निरीक्षक हरीष भोये, उपनिरीक्षक मंगेश जाधव, रमण सुरळकर, उमाकांत पाटील तसेच शहर वाहतूक शाखेच्या सहाय्यक निरीक्षक रुपाली चव्हाण व सहकाऱ्यांनी अपघातस्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. रात्री उशिरापर्यंत अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते.