भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरील हिमालय पेट्रोल पंपाजवळ विद्यार्थी आदित्य सावकारे याच्यावर 18 रोजी जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात तीन अल्पवयीन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाहाटा कॉलेजमध्ये एक महिन्यापूर्वी विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला होता. एकमेकांकडे खुन्नसने पहातो म्हणून आपसात वाद होत होते. या वादाचे रूपांतर शुक्रवारी थेट चाकू हल्ल्यात झाले. हिमालय पेट्रोल पंपाजवळ आदित्य कैलास सावकारे (17) या विद्यार्थ्यावर चाकूने सपासप वार करण्यात आल्याने तो जबर जखमी झाला होता. त्याच्यावर ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार सुरू होते. त्यांनतर त्यास खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले.
याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात शनिवारी दुपारी तीन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. चाकू हल्ला करणारे तीनही संशयीत हे अल्पवयीन असल्याचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी सांगितले. या प्रकरणात अनेकांची चौकशी करण्यात आली आहे. अजूनही काही जणांना चौकशीकामी बोलाविले जाणार आहे. शिक्षण घेण्याच्या वयात हातात चाकू घेणार्यांची दादागिरी शहरात खपवून घेतली जाणार नाही, असे निरीक्षक गायकवाड यांनी सांगितले. या प्रकारामुळे महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.