Election Analysis : लाडक्या बहिणींच्या साथीसह हिंदुत्वाचा मुद्दा ठरला प्रभावी

Bhusawal Assembly Constituency, गणेश वाघ  : भुसावळ विधानसभेच्या पटलावर सलग तीन पंचवार्षिकपासून आमदार असलेल्या संजय सावकारे यांची लढत महाविकास आघाडीतील काँग्रेस उमेदवार डॉ. राजेश मानवतकर यांच्याशी झाली. आधी तुतारीचा प्रचार जोमाने केल्यानंतर ऐनवेळी काँग्रेसला जागा सुटल्यानंतर उमेदवारीची माळ डॉ. राजेश मानवतकर यांच्या गळ्यात टाकण्यात आल्यानंतर दोन्ही उमेदवारांमध्ये नुरा कुस्तीसारखी लढत झाली.

तीन टर्मपासून केलेली कामे, जनसामान्यांमध्ये निर्माण झालेली स्वच्छ प्रतिमा, हिंदूत्वाचा प्रभावी मुद्दा व लाडक्या बहिणींच्या लाभलेल्या अनमोल साथीमुळे आम दार सावकारे यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला. ४७ हजार ४८८ मतांनी आमदार सावकारे येथे विजयी झाले तर महाविकास आघाडीतील नेत्यांनी सोयीचे राजकारण केल्याने येथे काँग्रेस उमेदवाराचा पराभव झाला.

हिंदूत्वाचा मुद्दा प्रभावी
सलग तीन पंचवार्षिकपासून निर्विवाद वर्चस्व मिळवत आमदार असलेल्या संजय सावकारे यांनी गेल्या काळात विविध विकासकामे मार्गी लावली. स्वच्छ प्रतिमेमुळे सर्वच समाज घटकांमध्ये त्यांना स्थान पुन्हा अधोरेखीत झाले शिवाय निवडणुकीपूर्वी लागू करण्यात आलेली लाडकी बहिण योजना व ‘एक है तो सेफ हैं’चा प्रचार जोमात करण्यात आला. महायुतीच्या भुसावळ विभागातील तीन उमेदवारांसाठी गृहमंत्री अमित शहा यांनी फैजपुरात सभा घेत ‘बटेंगे तो कटेंगे’ हा मुद्दा तळागाळातील हिंदूपर्यंत प्रभावीपणे पोहोचवला. भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने जीवाचे रान केले शिवाय स्थानिक भाजपाच्या सर्व नगरसेवकांनी आम दारांच्या विजयासाठी होम टू होम प्रचार करीत जनतेत सुरक्षीत हातात भुसावळची सत्ता जाणार असल्याचा विश्वास निर्माण केला. आमदारांच्या सौभाग्यवती रजनी सावकारे यांनी प्रतिष्ठा महिला मंडळाच्या माध्यमातून महिलांना एकजूट करीत विजयासाठी स्त्री शक्तीची ताकद उभी केली.

मतविभाजनाची खेळी अयशस्वी
आमदार सावकारे यांना पराभूत करण्यासाठी राजकीय पक्षांनी अपक्ष उमेदवार व लेवा समाजाच्या सून स्वाती जंगले यांना बळ दिले. भुसावळातील किंग मेकर असलेला लेवा समाज त्यांच्या पाठीशी राहून डॉ. मानवतकर यांचा विजयाचा मार्ग सुकर होईल, अशी खेळी असलीतरी नऊ हजार ७६४ मतांच्या पलीकडे त्या मते घेवू शकल्या नाही तर वंचितचे जगन सोनवणे यांना अवघे तीन हजार ७२० मते मिळाल्याने त्यांचे डिपॉजिटही जप्त झाले.

काँग्रेसचा उमेदवार नवखाः मात्र मतांचा वाढला आकडा
डॉ. राजेश मानवतकर राजकारणात नवखे होते. शिवाय महाविकास आघाडीतील नेत्यांची त्यांना विजयासाठी प्रभावी ताकद मिळालीच नाही. मात्र आहे त्या कार्यकर्त्यांच्या जोरावर डॉक्टरांनी ५९ हजार ७७१ मते मिळवली हे विशेष! २०१९ मध्ये त्यांच्या सौभाग्यवती डॉ. मधू मानवतकर अपक्ष उमेदवार असताना २८ हजार ६७५ मते मिळाली होती. पण यावेळी डॉक्टरांनी दुप्पट मते मिळवली. नियोजन व समन्वयाचा अभाव, नेत्यांमध्ये नसलेला ताळमेळ व वरिष्ठ नेत्यांनी घेतलेली सोयीची भूमिका यामुळे काँग्रेस उमेदवाराचे व्हीजन मतदारांपर्यंत पोहोचलेच नाही. शिवाय माध्यमांपासून उमेदवार अलिप्त राहिल्याने त्याचा फटका पराभवात झाल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.

राष्ट्रवादी नेतृत्वाची खेळी ऐनवेळी काँग्रेसला सोडले तिकीट
माजी मंत्री एकनाथराव खडसे व माजी आमदार संतोष चौधरींमधील वितुष्ट पाहता राष्ट्रवादीने हक्काची जागा भुसावळातील मतदारांचा कल व नेत्यांमधील कलगीतुरा पाहता काँग्रेसला सहज सोडली. काँग्रेसचा गेल्या काही वर्षांमध्ये साधा येथे नगरसेवकही निवडून आलेला नाही शिवाय जनतेत प्रभाव निर्माण होईल, असा एकही स्थानिक नेता नसल्याने सारी भिस्त महाविकास आघाडीच्या नेत्यांवर राहिली. माजी मंत्री खडसे हे मुलीच्या विजयासाठी मुक्ताईनगरात अडकले तर माजी आमदार संतोष चौधरी हे बंधू अनिल चौधरी यांच्यासाठी रावेरात ताकद लावून असल्याने नवखे उमेदवार डॉ. मानवतकर एकाकी पडले. महाविकास आघाडीतील उबाठा गट अपक्ष उमेदवार स्वाती जंगले यांच्यासोबत गेल्याने ताकद विभागली गेल्याने सावकारेंच्या विजयाचा मार्ग सोपा झाला.

भुसावळकरांनी दिला सुज्ञतेचा परिचय
राजकीय पक्षांनी विजयासाठी केलेली मतविभाजनाची खेळी सुज्ञ मतदारांनी ओळखत त्यांना धोबीपछाड देत आमदार सावकारेंना भरभरून मतदान करीत त्यांना सलग चौथ्यांदा आमदार म्हणून विजयी केले. सामाजिक समीकरणांना आमदार सावकारे यांनी छेद देत सलग चौथ्यांदा विधानसभेत आपले वर्चस्व सिद्ध करीत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.