भुसावळ : भुसावळातील सतर्क लोहमार्ग व रेल्वे सुरक्षा बलाने अहमदाबादकडे होणारी गांज्याची तस्करी रोखत प्रवाशाला ताब्यात घेत त्याच्याकडून ४० हजार रुपये किंम तीचा गांजा जप्त केला. सातत्याने रेल्वे स्थानकावर गांजावर होत असलेली कारवाई पाहता मोठे नेटवर्क कार्यरत असल्याची शक्यता आहे. मंगळवारी पहाटे १.४० वाजता रेल्वे स्थानकावर ही कारवाई करण्यात आली. समीर खान जमील खान (रा.अहमदाबाद, गुजराथ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
बॅग तपासणीदरम्यान यंत्रणेची कारवाई
जंक्शन रेल्वे स्थानकावरील बसस्थानकाकडील बाजूस असलेल्या मुसाफिर खान्याच्या परिसरात असलेल्या लगेज स्कॅनरवर प्रवासी समीर खान जमील खान (रा. अहमदाबाद, गुजराथ) याची बॅग तपासल्यानंतर त्यात संशयास्पद पाकिट आढळल्यानंतर ते पंचासमसक्ष फोडण्यात आले असता त्यात चार किलो वजनाचा व ४० हजार रुपये किंमतीचा गांजा आढळला. ही कारवाई सहायक आयुक्त अशोककुमार, स्थानक निरीक्षक पी.आर. मीना यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे सुरक्षा बलाचे जवान रफिक शेख, भूषण पाटील, अतुल कराळे आदींच्या पथकाने केली.
संशयित समीर खान जमील खान यास अटक केल्यानंतर त्याच्याविरोधात लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीताने हा गांजा मलकापूर येथून बसद्वारे आणल्याची माहिती असून हा गांजा अहमदाबाद येथे विक्रीसाठी नेला जात असल्याचे समजते. यंत्रणेकडून याबाबत सखोल चौकशी केली जात आहे. अधिक तपास लोहमार्ग पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुधीर धायरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.