---Advertisement---
Bhusawal Crime : शहरातील एका शाळेत शिकणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला खोटा भाऊ असल्याचे सांगून शाळेतून पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संशयित तौसिफ जहाबाद तडवी (वय २२, रा. पाल, ता. रावेर) याच्याविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी यावल परिसरात सापळा रचून संशयितास अटक केली आहे.
दरम्यान, घटनेतील संशयित तौसिफ जहाबाद तडवी याला न्यायालयात हजर केले असता, १८ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पीडित मुलगी रावेर तालुक्यातील रहिवासी असून, ती भुसावळ येथील शाळेत शिक्षण घेत होती. ७ ऑगस्टला तडवी शाळेत येऊन मुख्याध्यापकांना लेखी अर्ज देत स्वतःला मुलीचा भाऊ असल्याचे खोटे सांगितले.
मुख्याध्यापकांची दिशाभूल करून त्याने मुलीला सोबत घेतले व मुंबई, चोपडा आणि जळगाव येथे नेले होते. ९ ऑगस्टला जळगाव शहरातील एका हॉटेलमध्ये संशयिताने मुलीवर अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत पीडितेच्या वडिलांनी तत्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार १२ ऑगस्टला रात्री संशयिताविरुद्ध अपहरण व लैंगिक अत्याचाराचा गुन्हा बाजारपेठ पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला.
गुन्ह्याच्या गंभीरतेचा विचार करून पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश देशमुख, प्रशांत सोनार, भूषण चौधरी आदींच्या पथकाने यावल परिसरात रात्री सापळा रचत संशयिताला ताब्यात घेतले. १३ ऑगस्टला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला १८ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली.