Bhusawal Crime : भुसावळ तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तालुक्यातील साकेगाव येथील हा प्रकार असून या ठिकाणी एका प्रियकराने आपल्या विवाहित प्रेयसीचा चाकू भोसकून खून केला आहे. 25 रोजी रात्री 11 वाजून 30 मिनिटांच्या दरम्यान मयत विवाहिता आणि तिच्या प्रियकरामध्ये वाद होत विवाहितेला आपला प्राण गमवावा लागला. अनैतिक संबंधातून झालेल्या या खूनाच्या घटनेमुळे साकेगावत एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हत्या झालेली विवाहिता ही पती आणि मुलांसह साकेगावात राहत होती. या विवाहितेचे गावतीलच सागर रमेश कोळी याच्याशी प्रेम संबंध होते. दरम्यान, 25 सप्टेंबर 2024 रोजी रात्री 11 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास सागर आणि सोनाली यांचा गावातील भवानी नगरात वाद झाला. यावेळी सागर हा विवाहितेला (प्रेयसी) जोरजोराने शिविगाळ करत होता. त्यानंतर सागर याने त्याच्या हातातील चाकुने विवाहितेच्या पोटावर, पाठीवर हातावर चाकू भोसकून तिला गंभीर जखमी केले. या हल्ल्यानंतर विवाहिता ही रक्ताच्या थारोळ्यात जमीनीवर पडलेली असताना गावातील अनंदा ठाकरे यांनी तिला जवळच असलेल्या ट्रामा केअर सेंटरमध्ये नेले असता डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. अतिरक्तस्त्राव झाल्याने रुग्णालयात पोहोचण्या पूर्वीच तिचा मृत्यू झाला.
वाचवणाऱ्यावर देखील केला हल्ला
हत्येचा हा संपूर्ण प्रकार भवानी नगरात विनोद कुंभार यांच्या घरासमोर झाला. दरम्यान, सागर आणि विवाहिता यांच्यातील भांडणाचा आवाज ऐकून विनोद कुंभार घराबाहेर आले. यावेळी त्यांनी विवाहितेवर चाकुने वार करणाऱ्या सागरला आडवण्याचा प्रयत्न केला असता विनोद कुंभर यांच्या हातालाही चाकू लागला. तरी ते विवाहितेला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना सागर याने त्यांना ‘तु आमच्या मधात येवू नकोस, नाहीतर तुलाही मारुन टाकीन’ असा दम दिला. त्यामुळे जिवाच्या भितीपोटी विनोद कुंभार हे पुढे गेले नाही. दरम्यान सागरसे विवाहितेवर सपासप वार करुन तिचा खून केला. या प्रकरणी स्वत: विनोद कुंभार यांनी पोलिसात सागर कोळी याच्या विरोधात फिर्याद दिल्याने खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी घटनास्थळी भेट देत केला पंचनामा
खुनाच्या या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे पो.नि. महेश गायकवाड, एपीआय खंडेराव, पोलिस कर्मचारी बाळू पाटील, संजय तायडे, वाल्मिक सोनवणे, जगदीश भोई यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच आरोपी सागर कोळी यास ताब्यात घेतले आहे.