Bhusawal Crime : भुसावळात भरदिवसा घर फोडले; पावणे दोन लाखांचे दागिने लंपास

---Advertisement---

 

Bhusawal Crime : शहरातील नॉर्थ कॉलनी भागात भरदिवसा एक धक्कादायक घरफोडीची घटना समोर आली आहे. अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत सुमारे १ लाख ८७ हजार ५०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक उद्धव डमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी चेतन चंद्रमणी शिंदे (वय २५) हे शहरातील नॉर्थ कॉलनी भागात आई-वडील बहिणीसह राहतात. ते संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात अध्यापक म्हणून सेवारत आहेत. ते व त्यांचे वडील चंद्रमणी शिंदे कामावर गेले असताना, त्यांची आई व लहान बहीण नेहा या रूटीन तपासणीसाठी रेल्वे हॉस्पिटलला गेल्या होत्या. घराला कुलूप लावून त्या दुपारी १२ वाजता घराबाहेर पडल्या. दरम्यान, दुपारी दीडला परत आत्यानंतर त्यांना मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले.

घरात प्रवेश केल्यावर बेडरूम व किचनमधील कपाटे उघडून सामान अस्ताव्यस्त टाकलेले आढळले. कपाटातील लॉकरमधून ३ तोळे वजनाची काळ्या मण्यांचे सोन्याचे मंगळसूत्र किंमत ७५ हजार रुपये, १ तोळ्याचा डिझाईनयुक्त सोन्याचा नेकलेस किंमत २५ हजार रुपये, १ तोळ्याचे कानातील सोन्याचे झुमके किंमत २५ हजार रुपये, ५ ग्रॅमचे सोन्याचे टॉप्स किंमत १२ हजार ५०० रुपये, ४ ग्रॅमची काळ्या मण्यांची पोत किंमत १० हजार रुपये, अर्धा किलो वजनाचे चांदीचे कडे-पाटले किंमत ४० हजार रुपये याप्रमाणे दागिने चोरीस गेले आहेत.

पोलिसांची घटनास्थळी धाव

मुद्देमालाची अंदाजे किंमत १ लाख ८७ हजार ५०० रुपये आहे. घटनेची माहिती मिळताच चेतन शिंदे घरी आले व त्वरित पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. भरदिवसा झालेल्या घरफोडीमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. पोलिसांकडून श्वानपथक व ठसेतज्ज्ञांच्या साहाय्याने तपास सुरू आहे. लवकरच चोरट्यांचा छडा लावण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---