Bhusawal Crime News : रेल्वेच्या जनरल डब्यात श्वान वीरूने शोधला गांजा

भुसावळ : रेल्वे सुरक्षा दलाच्या श्वान पथकाच्या तपासणी दरम्यान गांधीधाम एक्सप्रेस गाडी ही अकोला स्थानकावरुन सुटली असता जनरल डब्यात एक बेवारस बॅग आढळून आली.  श्वान ‘वीरू’च्या मदतीने ३ किलो ९०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. याची किंमत ४०  हजार रुपये इतकी आहे. याप्रकरणी भुसावळ रेल्वे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ रेल्वे सुरक्षा बल पथकातील पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र इंगळे व दीपक पाटील हे श्वान पथकासोबत नेहमीप्रमाणे  प्रत्येक रेल्वेच्या डब्यांची तपासणी करीत होते. तपासणी दरम्यान गांधीधाम एक्सप्रेसमधील जनरल डब्यात एक बेवारस बॅग मिळून आली. या बॅगेची तपासणी केली असता त्या बॅगेत सुमारे ४० हजार रूपये किंमतीचा गांजा मिळून आला. हि बॅग भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने ताब्यात घेतली.

अप गांधीधाम एक्स्प्रेस अकोल्याहून अहमदाबादकडे शुक्रवार ३० ऑगस्ट रोजी निघाली होती. या गाडीत  रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक आर.के.सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली डॉग स्कॉड पथकाचे हॅण्डलर हवालदार जितेंद्र इंगळे व हवालदार दीपक पाटील हे अकोला रेल्वे स्थानकापासून रेल्वेत चढले. यावेळी गार्ड पासूनच्या जनरल (सर्वसाधारण) डब्यांची तपासणी करण्यात येत होती. गाडी मलकापूर-बोदवड दरम्यान आली असता तिसर्‍या क्रमांकाच्या जनरल डब्यात प्रवाशांच्या शीटखाली असलेल्या एका बॅगेत संशयास्पद वस्तू असल्याचा सिग्नल ‘वीरू’ नामक श्वानाने हॅण्डलरला दिला. कर्मचार्‍यांनी ही बाब आपल्या वरिष्ठांना कळवली. भुसावळ आल्यानंतर बॅग उघडली असता त्यात ४०  हजार किंमतीचा ३ किलो ९०० ग्रामचा जवळपास चार किलो गांजा आढळून आला.

रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक पी.आर.मीना व सहकार्‍यांनी तातडीने धाव घेत बॅगेची पाहणी केली. गांजा कोणाचा हे समजून आलेले नाही. सायंकाळी उशिरा लोहमार्ग पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास लोहमार्गचे पोलीस निरीक्षक सुधीर धायरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक किसन राख करीत आहेत.