भुसावळ : तालुक्यातील एकाला स्थानिक गुन्हे शाखेने गावठी कट्टा व आठ जिवंत काडतूसह अटक केली आहे. त्याच्या विरोधात वरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी जिल्ह्यात अवैध शस्त्र वापरुन दहशत माजविणाऱ्यांची गोपनीय माहित काढून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा पथकाला दिले. यानुसार पोलीस नाईक श्रीकृष्ण देशमुख हे वरणगाव शहरात पेट्रोलींग करीत होते. यावेळी गोपनिय माहीतीच्या आधारे वरणगाव शहरातील राज उर्फ मनोज याच्या जवळ गावठी कट्टा बाळगत असल्याची बातमी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना सांगितली.
त्याआधारे पोलीस हवालदार प्रितम पाटील, पोलीस नाईक श्रीकृष्ण देशमुख यांच्या पथकाने तत्काळ राज उर्फ मनोज सुरेश शिंदे (वय ३९, रा. रामपेठ वरणगाव ह.मु. शिवराय चौक फुलगाव वरणगाव ता. भुसावळ) याला ताब्यात घेतले. पथकाला राज उर्फ मनोज यास वरणगाव शहरातील तिरंगा चौकातील श्री स्वामी समर्थ कॉम्प्लेक्स येथील राज मोबाईल रिपेअरिंग या दुकानाजवळ आढळला. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात २५ हजार रुपयाची किमतीचा एक गावठी बनावठीची पिस्टल व ८ हजार रुपये किमतीचे ८ जिवंत काडतुस मिळुन आले. त्याच्या विरुध्द वरणगाव पोलीस स्टेशन येथे १६५/२०२४ शस्त्र अधिनियम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, जळगाव, उपविभागीय पोलीस अधिकारी मुक्ताईनगर, राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.