Bhusawal Crime News : बनावट नोटांची विक्री करणारे तिघे पोलिसांच्या ताब्यात

भुसावळ :  बनावट चलनी नोटा बाजारात विक्रीसाठी आलेल्या तिघांना बाजारपेठ पोलिसांनी बुधवारी जेरबंद केले आहे. तिघांमध्ये जळगाव व रावेर  येथील संशयीतांचा समावेश आहे. या तिघांकडून तीन लाखाच्या बनावट चलनी नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

सय्यद मुशारद अली मुमताज अली (वय ३८, रा. दुश्मनीय पार्क शिवाजीनगर जळगाव), नदीम खान रहीम खान (वय ३,० रा. सुभाष चौक शनिवार पेठ जळगाव), अब्दुल हकीम अब्दुल कादर (वय ५७, अब्दुल अमित चौक रसलपुर रोड रावेर) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी,भुसावळ शहरात काही व्यक्ती बनावट चलनी नोटा ह्या विकीसाठी येत आहेत, अशी गुप्त माहिती बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना मिळाली होती. याआधारे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी पथक तयार केले.

भुसावळ शहरात या पथकाने सापळा रचत मोठ्या शिताफीने तिघांना बनावट चलनी नोटांसह बेड्या ठोकल्या. संशयित हे एका लाखाच्या खऱ्या नोटा बदलून तीन लाखाच्या बनावट चलनी नोटा बदलून देण्यात येणार होते. पोलिसांनी याची संपूर्ण तयारी केली होती.

बुधवारी सायंकाळी संशयितांनी तीन ठिकाणे बदलून त्यांनी एका ठिकाणी व्यवहार पूर्ण केला. व्यवहार पूर्ण होताच दबा धरून बसलेल्या पोलीस पथकातील कर्मचाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले. रात्री उशिरा स्टेट बँकेच्या अधिकार्‍यांकडून नोटांचे व्हेरिफिकेशन करण्यात आले.