Bhusawal Crime : भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाच्या गस्तीवरील कर्मचाऱ्याला चाकू दाखवून धमकावणाऱ्या त्रिकुटाविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. एका संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. मिहीर दिलीप तायडे (२४, भुसावळ) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. रेल्वे सुरक्षा बलाचे साहाय्यक फौजदार लालजी श्रद्धानंद यादव (४३. आरपीएफ बॅरेक, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, बुधवारी (१६ एप्रिल) रात्री ११.३० वाजता वरणगाव रोडवरील पंधरा बंगला भागात गस्त घालत असताना तिन्ही तरुण संशयितरीत्या फिरताना आढळल्याने त्यांना हटकले होते. आरोपी रितीकने तुम अपना काम करो, मेरा काम रेल्वे का लोहा चोरी करना है, असे सांगून हुज्जत घातली. देशमुख नामक संशयिताने तू भाई को पहचानता नही क्या, भाईने मुक्ताईनगर के आमदार पर फायरिंग किया था. असे सांगितल्यानंतर संशयित देशमुखने चाकू काढून मारण्याची धमकी दिली. आरोपी रितीक निंदाणे, देशमुख व अन्य एका अनोळखीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी या गुन्ह्यातील मिहीर दिलीप तायडे (२४, भुसावळ) यास अटक केली असून न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल करीत आहेत.
दोन संशयितांनी फुलगावात दुचाकी पेटवली
भुसावळ शहर पोलिसात काही दिवसांपूर्वी तृतीयपंथी तुषार उर्फ तानिया अनंत बाऊस्कर (२९, फुलगाव) हिच्यावर डीआरएम कार्यालयाजवळ हल्ला करण्यात आला होता. शहर पोलिसात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या रागातून संशयित निखिल हरणे व मिहीर तायडे (दोन्ही रा. भुसावळ) यांनी १७ रोजी पहाटे तीन वाजता बाऊस्कर यांची दुचाकी (एम.एच.१९- ई.पी.६४६९) पेटवून दिल्याने दुचाकीचे नुकसान झाले.
याप्रकरणी वरणगाव पोलिसात दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हवालदार गणेश राठोड करीत आहेत.