भुसावळ : एक लाखांच्या बदल्यात तीन लाखांच्या बनावट नोटा देताना भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी रावेरातील एकासह जळगावच्या दोन संशयीतांना अटक केली होती. संशयीतांची सखोल चौकशी केल्यानंतर रावेरच्या संशयीताकडून पुन्हा ५० हजारांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या तर या गुन्ह्यात आणखी दोघांची नावे समाविष्ट करण्यात आली असून संशयीतांचा कसून शोध सुरू असल्याची माहिती बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी दिली.
बनावट नोटा प्रकरणी भुसावळात कारवाई
बुधवार, ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी शहरातील नाहाटा चौफुलीजवळ जळगावच्या दोघांसह रावेरच्या एकाला बनावट नोटांची डील करताना बाजारपेठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या व संशयीतांकडून तब्बल तीन लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. संशयीत अब्दुल हमीद कागल याच्याविरोधात यापूर्वी तब्बल पाच गुन्हे बनावट नोटा प्रकरणी दाखल असून त्याची पोलीस कोठडीत सखोल चौकशी केल्यानंतर त्याच्याकडून पुन्हा ५० हजारांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. या गुन्ह्यात सैय्यद मुशाईद अली मुमताज अली (३८, रा.उस्मानिया पार्क, शिवाजीनगर, जळगाव), नदीम खान रहीम खान (३५, रा.सुभाष चौक, शनिपेठ, जळगाव), अब्दुल हमीद कागल (५७, रा. रसलपुर रोड, अब्दुल हमीद चौक, रावेर) यांना अटक करण्यात आली आहे. संशयीतांची पोलीस कोठडी मंगळवार, १० सप्टेंबरला संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे करीत आहे.
गुन्ह्यात दोन आरोपींची नावे वाढवली बनावट नोटा प्रकरणी अटकेतील
संशयीताच्या माहितीच्या आधारे प्रतीक सुरेश नवलखे (रा. बऱ्हाणपूर) व राहुल राजेंद्र काबरा (रा. चिखलदरा, संभाजीनगर) यांनादेखील आरोपी करण्यात आले असून या गुन्ह्यातील आरोपींची संख्या आता पाच झाली आहे तर वरील दोघा पसार आरोपींचा कसून शोध सुरू आहे. लवकरच दोन्ही आरोपींना अटक करण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक राहुल वाघ म्हणाले.