Bhusawal News:  विजेच्या धक्याने म्हैस ठार, सुनसगावातील घटना

by team

---Advertisement---

 

Bhusawal News: भुसावळ तालुक्यातील सुनसगाव येथील शाळेच्या रस्त्यावर असलेल्या रोहित्राच्या खांबात विजप्रवाह उतरल्याने शॉक लागून एक म्हैस जागीच ठार झाली. ही घटना रविवारी (दि.२४ ऑगस्ट) सकाळी सुमारे ११ वाजता घडली. संजय मुरलीधर बोदडे यांच्या मालकीची ही म्हैस जाफरी जातीची असून सुमारे एक लाख रुपये किमतीची होती.

संजय बोदडे हे त्यांच्या म्हशीसह रानात चारण्यासाठी चालले असताना रोहित्र क्रमांक ६०१ जवळ वाढलेले गवत खाण्यासाठी म्हैस गेली. त्याचवेळी विज खांबाजवळील तारांचा स्पर्श होताच म्हैस जागीच कोसळली. संजय बोदडे व सुपडू कंखरे यांनी म्हशीला वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही विजेचा धक्का बसला. सुदैवाने ते बचावले.

घटनेनंतर भुसावळ तालुका पोलिसांनी पंचनामा केला असून म्हशीचे शवविच्छेदनही करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी याच परिसरात जगन्नाथ चांगो कंखरे यांच्या बैलाचाही अशाच प्रकारे विजेच्या धक्याने मृत्यू झाला होता.

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांत संतापाची लाट पसरली आहे. सदर रोहित्राजवळ नेहमी चिखल व ओलावा असल्याने अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी महावितरण कंपनीने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे या रस्त्यावरूनच गावातील विद्यार्थी हायस्कूलमध्ये शिक्षणासाठी ये-जा करतात. मात्र रविवार असल्याने शाळा बंद होती आणि मोठा अनर्थ टळला. म्हैस मालक संजय बोदडे यांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे. महावितरणचे अधिकारी आणि प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---