---Advertisement---
Bhusawal News : भुसावळ येथील श्री जय गणेश ज्येष्ठ नागरिक संघातर्फे सामाजिक कार्य उपक्रमांतर्गत पहिली ते सातवीच्या वर्गातील मुला- मुलींसाठी बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये एकूण 40 बालकांनी सहभाग घेतला. बालकांमधील सुप्त गुणांना संधी मिळावी, त्यांच्यातील आत्मविश्वास व सभाधिटपणा वाढावा तसेच त्यांच्यावर संस्कार व्हावेत या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आरंभी जेष्ठ कार्यकारणी सदस्य श्री शांताराम बोबडे यांनी श्री गणेशाचे पूजन करून कै. अरुण मांडळकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. सुरुवातीला मुलांची कवायत घेण्यात आली .
त्यानंतर विविध स्पर्धा घेण्यात आल्या .लहान गटासाठी लंगडी व बकेट बॉल या स्पर्धा घेण्यात आल्या .लंगडी स्पर्धेत गौरी महाजन व मीहीका चौधरी यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त केला. बकेट बॉल स्पर्धेत तनुज ढाके प्रथम व गौरी महाजन द्वितीय क्रमांकाने यशस्वी झाले. मोठ्या गटासाठी स्मरणशक्ती व काठी पकडणे या स्पर्धा घेण्यात आल्या. स्मरणशक्ती स्पर्धेत भाविका घुले प्रथम व ओवी खराटे हिने द्वितीय क्रमांकाने यश प्राप्त केले .काठी पकडणे स्पर्धेत प्रथम रुद्रसिंग चौधरी व द्वितीय ओवी खराटे यशस्वी झाले.
कला सादरीकरणात एकूण बारा जणांनी सहभाग घेतला .वंश राम वंशी (भजन) ,मीहीका चौधरी (भजन), गायत्री महाले (हनुमान चालीसा नृत्य), उर्वी कोटेचा (संस्कृत श्लोक), तनुज ढाके (बासरी विषयी माहिती), दीक्षा जैन (हनुमान चालीसा ),शिवन्या वानखेडे व हिताक्षी (बालगीत), ओवी खराटे (गोष्ट), मानसी सोनवणे (कविता) तसेच मनवा पवार, मितवा पवार, भाविका घुले व ओवी सोहळे यांनी मुलींच्या शिक्षणावर नाटिकेचे सादरीकरण केले श्री राजेंद्र बावस्कर यांनी बिरबलाच्या कथेतून प्रशिक्षण न घेता आपण स्वतःशी स्पर्धा करून यश प्राप्त करता येते हा संदेश दिला. स्पर्धेत यशस्वी झालेल्या सर्व बालकांना तसेच कला सादरीकरण केलेल्या बालकांना श्री शांताराम बोबडे, श्री सुपडू कुरकुरे, श्री राजेंद्र बावस्कर व श्री विलास चौधरी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. सर्व बालकांना आजी व आजोबांनी खाऊ वाटला.
शिबिराचे संचालन संघ अध्यक्षा डॉ.सुधा खराटे यांनी केले. आभार कोषाध्यक्ष डी .एस. पाटील यांनी मानले. शिबीर यशस्वी करण्यासाठी सौ. कुसुम पाटील ,श्री नारायण वडदकर ,श्री प्रकाश तायडे व संघ सदस्यांनी परिश्रम घेतले.