---Advertisement---
स्थानिक गुन्हे शाखा आणि भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या संयुक्त पथकाने शहरात गांजाची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या मध्य प्रदेशातील तरुणाला अटक केली आहे. त्याच्याकडून १०.२७५ किलो गांजासह सुमारे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार गोपाळ गव्हाळे यांना शुक्रवारी (२२ ऑगस्ट) पहाटे पावणेदोनच्या सुमारास एक व्यक्ती दुचाकीवरून गांजाची वाहतूक करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल सुरुची इनसमोर पोलिसांनी सापळा रचला. गोपनीय माहितीनुसार काळ्या रंगाच्या सीबी शाइन दुचाकीवर संशयित दिसून आला. पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न करताच, तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, पथकाने शिताफीने त्याला ताब्यात घेतले. त्याची ओळख अनारसिंग वालसिंग भिलाला (३०, रा. शमलकोट, ता. झिरण्या, जि. खरगोन, मध्य प्रदेश) अशी झाली. संशयिताकडून ७५ हजारांची दुचाकी, दोन लाख पाच हजार ५०० रुपये किमतीचा १०.२७५ किलो गांजा, दहा हजारांचा मोबाइल, असा सुमारे दोन लाख ९० हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
याप्रकरणी पोलिस शिपाई विकास सातदिवे यांच्या फिर्यादीवरून भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात अनारसिंग भिलालाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप पाटील, पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शरद बागल, रवी नरवाडे, हवालदार गोपाळ गव्हाळे, संदीप चव्हाण, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, प्रशांत पाटील, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे, महेश सोमवंशी, सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन पाटील, हर्षल महाजन, परेश बिऱ्हाडे यांच्या पथकाने केली.