Bhuswal News : शहरातील जामनेर रोडवरील वाल्मीक नगरात शुक्रवारी, (१८ एप्रिल) मध्यरात्रीच्या सुमारास दोन गटांमध्ये जोरदार दगडफेक होऊन मारहाण झाली. या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला. मात्र पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी पोलिसांनी पुढाकार घेत स्वतः फिर्याद दिल्यावरून १४ जणांविरोधात दंगलीचा गुन्हा बाजारपेठ पोलिसात दाखल करण्यात आला, तर चौघांना अटक करण्यात आली. दरम्यान, घटनास्थळी गोळीबार झाल्याचा दावाही करण्यात आला होता. मात्र तपासात हा प्रकार बनावट असल्याचेही निष्पन्न झाले.
दोन गट भिडले
शुक्रवारी रात्री ११.४५ वाजता वाल्मीक नगरात दोन गटांमध्ये भांडण सुरू असत्याची माहिती बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना मिळाली. त्यांनी मिळालेल्या माहितीची खात्री करण्यासाठी सहायक निरीक्षक अमितकुमार बागुल, हवालदार अमर आढाळे, जितेंद्र पाटील, प्रशांत परदेशी, योगेश माळी यांना पाठवले. पोलिसांचे पथक घटनास्थळावर दाखल झाल्यावरसुध्दा दोन वेगवेगळ्या गटांत सुमारे २० ते २५ जण आपसात मारामारी करीत होते.
या वेळी मोठा जमाव एकमेकावर दगडफेक, शिवीगाळ, मारहाण करीत होते. घटनास्थळी पोलिसांना ७.६५ मिमी बंदुकीची रिकामी पुंगळी आढळली. निखिल धामणे याने आकाश रायसिंग पंडितने फायरिंग केल्याचा दावा केला. मात्र तपासात ही गोष्ट खोटी असल्याचे समोर आले असून खोटा पुरावा तयार करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले.
पोलिसांकडून संशयितांचा कसून शोध
शुक्रवारी रात्री झालेल्या घटनेनंतर दोन्ही बाजूकडील लोकांनी आपसात समझोता केला होता, असे पोलिसांनी सांगितले. मात्र शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ व त्यांच्या सहकाऱ्यांनी वाल्मीक नगर गाठले. तेथून दादागिरी करणाऱ्यांचा शोध घेतला. यात अनेक जण पसार झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून गावठी पिस्टलाच्या गोळीची रिकामी पुंगळी जप्त केली. ही पुंगळी कोणत्या पिस्टलातील आहे. याचाही शोध पोलीस घेत आहेत.
यांच्याविरुद्ध दाखल झाला गुन्हा
बाजारपेठ पोलिसात हवालदार अमरआढाळे यांच्या फिर्यादीवरून निखिल धामणे, प्रेम उर्फ गोपी धामणे, आनंद खरारे, अंकित छावरीया, भावेश बारसे, दादू नवगीरे, जय उर्फ कालू जाधव, बाबा घगट, आकाश रायसिंग पंडित, राज पंडित, धरमसिंग उर्फ गोलू रायसिंग पंडित, तुषार तुंडलायक, अभिषेक साठे, सोनू पथरोड व अन्य १० ते १२ अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
अटकेतील चौघांना न्यायालयीन कोठडी
दगडफेक प्रकरणी पोलिसांनी निखिल धामणे, प्रेम उर्फ गोपी धामणे, जय उर्फ कालू जाधव व आकाश रायसिंग पंडित (सर्व रा. वाल्मीक नगर, भुसावळ) यांना अटक केली होती. संशयितांना न्यायालयात हजर केले असता पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी केली. मात्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावत्याने संशयितांची जळगाव कारागृहात रवानगी करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू विष्णू सांगळे करीत आहेत.