धक्कादायक! विजेच्या धक्क्याने झिरो वायरमनाचा मृत्यू

तरुण भारत लाईव्ह न्यूज  धानोरा :  जवळच असलेल्या व सातपुड्याच्या पायथ्याशी आसलेल्या बिडगाव येथील झिरो वायरमनचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. दत्तू आत्माराम पाटील (वय 45, रा. बिडगाव) असे मयताचे नाव आहे. दत्तू पाटील हे डीपी सुरू करण्यासाठी गेले होते तेव्हा रविवारी सकाळी आठला ही घटना घडली.

महावितरणकडून सध्या थकीत वीज बिल वसुलीसाठी ग्राहकांचा वीजपुरवठा डीपीवरून खंडित करण्यात येत आहे. खंडित केलेला वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यासाठी दत्तू पाटील हे डीपीच्या ठिकाणी आले होते. घटना घडल्यानंतर वीज कंपनीचे सहायक अभियंता डी. डी. घरजारे व चोपडा विभागीय अभियंता एन. एन. रासकर हे तब्बल तीन तासानंतर अकरा वाजता आल्याने नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. यावेळी नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला. यामुळे नागरिकांनी वीज कंपनीच्या अधिकार्‍यांना मारहाण केली. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी केल्याने वातावरण निवळले.

मारहाणप्रकरणी वीज कंपनीच्या अधिकार्‍यांनी पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दिली नाही. या घटनेचा सहायक फौजदार सुनील तायडे व पो.कॉ. जयदीप राजपूत यांनी पंचनामा केला आहे. मयत दत्तू पाटील यांच्या मृतदेहाचे चोपडा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून दुपारी चार वाजता शोकाकुल वातावरणात बिडगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.