आंदोलनानंतर एमपीएससीची मोठी घोषणा, विद्यार्थ्यांनी…

आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीकडून घेण्यात येणारी नियमित राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन परीक्षा एकाच दिवशी होणार आहेत. यामुळे दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. यामुळे मागील तीन दिवसांपासून पुण्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीचे परीक्षार्थी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले आहेत.

मंगळवारी रात्रीपासूनच या विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन पुकारले.  यापार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीतर्फे २५ ऑगस्टरोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेची तारीख नंतर जाहीर करण्यात येईल, असे एमपीएससीने म्हटले आहे. गुरुवारी आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

आयोगाची बैठक गुरुवार,  २२ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांकडून दबाव वाढत असल्याने या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता होती. त्याप्रमाणे आयोगाने निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आंदोलक विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आलं असं म्हणालं लागेल.

देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात ट्वीट करून आयोगाचे आभार मानले आहेत. ते म्हणाले की, काल एमपीएससी अध्यक्षांना मी विनंती केली होती. या विनंतीला मान देत विद्यार्थी हिताचा निर्णय घेतल्याबद्दल मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सर्व सदस्य यांचा अत्यंत आभारी आहे.

दरम्यान,  एमपीएससी विद्यार्थ्यांनी आंदोलन तीव्र केलं होतं. याशिवाय या आंदोलनाला राजकीय नेत्यांनी पाठिंबा द्यायला सुरुवात केली होती. विरोधकांचा दबाव वाढल्याने सरकारने देखील सकारात्मक पाऊलं उचलण्यास सुरुवात केली होती. दरम्यान, फटाके घेऊन काही विद्यार्थी आंदोलन स्थळी आले आहेत. ⁠ज्युस देखील आणला आहे. त्यामुळे ⁠आंदोलन संपण्याची शक्यता आहे.