मेलबर्न कसोटीपूर्वी भारतीय संघात मोठा बदल, अश्विनच्या जागी मुंबईच्या ‘या’ खेळाडूला संधी

भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर आहे, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 अंतर्गत यजमानांविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. दोन्ही संघांमधील ही कसोटी मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. आता कसोटी मालिकेतील चौथा सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर (एमसीजी) २६ डिसेंबरपासून (गुरुवार) खेळवला जाणार आहे.

मेलबर्न कसोटीपूर्वी भारतीय संघाशी संबंधित मोठी बातमी समोर येत आहे. या मालिकेतील उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी मुंबईचा अष्टपैलू तनुष कोटियनचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. 26 वर्षीय तनुष उजव्या हाताने ऑफ-स्पिन गोलंदाजी करतो. तो एक चांगला फलंदाजही आहे. तनुषने रविचंद्रन अश्विनची जागा घेतली आहे.

तनुष कोटियनचा परिचय

तनुष कोटियनचा जन्म मुंबईत झाला असला तरी मात्र, त्यांच्या कुटुंब मूळचे कर्नाटकातले आहेत. तनुष कोटियनचे वडील करुणाकर आणि आई मल्लिका कोटियन हे उडुपी जिल्ह्यातील पंगला येथील आहेत. तनुष कोटियन हा केवळ मुंबईसाठी देशांतर्गत क्रिकेटच खेळत नाही, तर तो भारताच्या १९ वर्षांखालील संघाकडूनही खेळला आहे. भारत-अ च्या नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही तो संघाचा एक भाग होता.

तनुष कोटियनने 2018-19 रणजी हंगामात प्रथम श्रेणी पदार्पण केले. कोटियनने आतापर्यंत 33 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 25.70 च्या सरासरीने 101 विकेट घेतले आहेत. यादरम्यान त्याने 3 वेळा एका डावात पाच विकेट घेतल्या. त्याच्या फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर त्याने 41.21 च्या सरासरीने 1525 धावा केल्या आहेत. कोटियनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 2 शतके आणि 13 अर्धशतके झळकावली आहेत.

तनुष कोटियनने 20 लिस्ट-ए आणि 33 टी-20 सामनेही खेळले आहेत. लिस्ट-ए सामन्यांमध्ये कोटियनच्या नावावर 43.60 च्या सरासरीने 20 विकेट्स आहेत. त्याचवेळी, टी-20 सामन्यांमध्ये त्याने 20.03 च्या सरासरीने 33 विकेट घेतल्या आहेत. तनुष कोटियनने लिस्ट-ए सामन्यात 90 धावा आणि टी-20 सामन्यात 87 धावा केल्या आहेत.

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, अभिमन्यू इसवरन, देवदत्त पडिक्कल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, सरफराज खान, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज. , आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, तनुष कोटियन