---Advertisement---
Jalgaon Gold Rate : दोन आठवड्यांपासून भावात घसरण झालेल्या सोने-चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या भावात २१०० रुपयांनी वाढ होऊन ते एक लाख २२ हजार ४०० रुपयांवर पोहचले आहे. तर चांदीच्या भावात ४५०० रुपयांची वाढ होऊन ती एक लाख ५३ हजार ५०० रुपयांवर पोहचली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून नवनवीन उच्चांक गाठणाऱ्या सोने-चांदीच्या भावात ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मोठी घसरण झाली. २७ऑक्टोबर रोजी सोन्याच्या भावात चार हजार ३०० रुपयांनी घसरण होऊन ते एक लाख १८ हजार ५०० रुपयांवर आले होते. त्यानंतर २९ ऑक्टोबर रोजी एक हजार ५०० रुपयांची वाढ होऊन सोने एक लाख २० हजार रुपयांवर पोहचले होते.
थोडाफार चढउतार होत असलेले सोने ९ नोव्हेंबरपर्यंत एक लाख २० हजार ३०० रुपयांवर आले होते. मात्र १० नोव्हेंबर रोजी त्यात थेट २१०० रुपयांची वाढ झाली व सोने एक लाख २२ हजार ४०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले.
दुसरीकडे चांदीतही २८ ऑक्टोबर रोजी सहा हजार ५०० रुपयांची घसरण होऊन ती एक लाख ४७ हजार रुपयांवर आली होती. त्यानंतर चढ-उतार होत ९ नोव्हेंबरपर्यंत चांदी एक लाख ४९ हजार रुपयांपर्यंत आली. १० नोव्हेंबर रोजी त्यात थेट ४५०० रुपयांची वाढ होऊन चांदी एक लाख ५३ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहचली.
भारतीय रुपयाच्या तुलनेत अमेरिकन डॉलरचे दर वधारून ८८.७१ रुपयांवर पोहचल्याने व आंतरराष्ट्रीय पातळीवर मागणी वाढल्याने सोने-चांदीच्या भावात वाढ झाल्याचे सुवर्ण व्यावसायिक यांनी सांगितले.









