मोठी बातमी : ३१ ऑगस्ट ‘भटके विमुक्त दिवस’ म्हणून होणार साजरा

---Advertisement---

नागपूर: भटके विमुक्त समाजाच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी दरवर्षी ३१ ऑगस्ट हा दिवस ‘भटके विमुक्त दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल भाजप भटके विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राहुल केंद्रे व प्रदेश सरचिटणीस प्रमोद परदेशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारचे जाहीर आभार मानले आहेत.

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश भटके विमुक्त आघाडी आणि भटके विमुक्त विकास परिषदेच्या सततच्या मागणीनंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश सरकारांनीही त्यांच्या राज्यात ३१ ऑगस्ट हा दिवस ‘भटके विमुक्त दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही हा दिवस साजरा व्हावा, अशी मागणी करण्यात आली होती.

भटके विमुक्त समाजाच्या संस्कृतीतील जीवनमूल्ये, परंपरा यांचे दर्शन घडवणारे सांस्कृतिक, शैक्षणिक आणि माहितीपर कार्यक्रम आयोजित केले जातील. शासकीय व अनुदानित आश्रमशाळा तसेच वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, आधारकार्ड नोंदणी आणि जातीचा दाखला व जात वैधता प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती देणारे शिबिर आयोजित केले जातील. या निर्णयामुळे ब्रिटिश काळात या समाजावर लागलेला ‘कलंक’ मिटवण्याचा प्रयत्न झाल्याचे परदेशी यांनी सांगितले. ३१ ऑगस्ट रोजी सार्वजनिक सुट्टी असली तरीही हा दिवस साजरा केला जाईल, असे शासनाच्या निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. या कार्यक्रमांचे प्रभावीपणे आयोजन करण्यासाठी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सूचना देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

प्रदेश सरचिटणीस प्रमोद परदेशी यांनी आपली भावना व्यक्त करताना सांगितले की, “1871 साली ब्रिटिशांनी क्रिमिनल ट्रॅप ॲक्ट अंतर्गत काही जातींना गुन्हेगार जाती म्हणून घोषित केले होते, स्वातंत्र्यानंतर 31 ऑगस्ट 1952 रोजी क्रिमिनल ट्रॅप ॲक्ट हा कायदा रद्द करण्यात आला आणि या जातींना विमुक्त जाती म्हणजेच मुक्त झालेल्या म्हणून घोषित करण्यात आले. भटके विमुक्त समाज देशात व महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये आपले योगदान देत आहेत. भटके विमुक्त समाजाचे स्वातंत्र्यातील व राष्ट्र उभारणीतील योगदान लक्षात घेऊन त्यांच्या स्मरणार्थ 31 ऑगस्ट हा दिवस भटके विमुक्त दिवस म्हणून साजरा करण्यास मान्यता देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने 31 जुलै रोजी अखेर 31 ऑगस्ट हा दिवस भटके विमुक्त दिवस म्हणून साजरा करण्यासाठीचा शासन निर्णय घेतला आहे. हा निर्णय महाराष्ट्र राज्यातील भटके विमुक्तांसाठी अभिमानास्पद आहे. महायुतीचे सरकार भटके विमुक्तांसाठी विविध योजना राबवत आला आहे. येणाऱ्या काळामध्ये भटके विमुक्तांसाठी मोठ्या प्रमाणात महायुतीचे सरकार काम करेल असा विश्वास व्यक्त केला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---