मोठी बातमी : अखेर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सुटका

तरुण भारत लाईव्ह न्यूज । २८ डिसेंबर २०२२।  माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची अखेर आज 14 महिन्यांनी जामिनावर सुटका झाली आहे. आर्थर रोड तुरुंगातून ते बाहेर आले. देशमुख यांचा जामीन रद्द करण्याची सीबीआयची  मागणी हाय कोर्टाने फेटाळल्यानंतर आज बुधवारी अनिल देशमुख तुरुंगातून बाहेर आले. दरम्यान, मुंबईतील आर्थर रोड कारागृहाबाहेर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना अटक करून सत्तारुढ केंद्र सरकारने राष्ट्रवादी काँग्रेसला जेरीस आणण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रातलं मविआ सरकारचं अडचणीत आणण्यासाठी अनेक कारवाया झाल्या. त्यापैकी या दोन कारवाया आहेत. न्यायदेवतेने आज न्याय केल्याचं आजचं चित्र आहे. त्यामुळे त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही उत्सुक असल्याची प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.अनिल देशमुख यांच्या जामिनात वाढ करण्याची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती, त्यावर मंगळवारी न्यायालयात सुनावणी झाली. याचिका फेटाळून लावत न्यायालयाने अनिल देशमुख यांचा जामीन कायम ठेवला. त्यामुळे 100 कोटींच्या वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अनिल देशमुख यांच्या कुटुंबियांनी काय झेललंय, हे मी खूप जवळून पाहिल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

अनिल देशमुखांविरोधात ईडीने एकूण 109 वेळा धाड टाकली. पण एकही वेळा काहीही हाती आलं नाही, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली. हा जागतिक विक्रम असल्याचंही त्यांनी ठासून सांगितलं…अनिल देशमुख यांना सव्वा वर्षानंतर जामीन मिळाल्यानंतरही त्यांना जेलबाहेर काही अटींचं पालन करावं लागणार आहे. त्यांना विना परवानगी मुंबईच्या बाहेर जाता येणार नाही.