पीएफ खातेधारकांसाठी मोठी बातमी; ही सुविधा केली बंद

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) कोट्यवधी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. करोनाच्या काळात EPFO ​​ने कोट्यवधी पीएफ खातेधारकांना त्यांच्या खात्यातून आगाऊ पैसे काढण्याची मुभा दिली होती मात्र, आता ही सुविधा ईपीएफओ कडून बंद करण्यात आली आहे. म्हणजे आत्ता खातेदार कोविड आगाऊ सुविधेचा लाभ घेऊ शकत नाहीत. तीन वर्षात २.२ कोटी लोकांनी या सुविधेचा लाभ घेतला पण आता EPFO ​​ने ही सुविधा बंद केली आहे.

ईपीएफओच्या २०२२-२३ च्या वार्षिक अहवालानुसार, एकूण २.२ कोटी सदस्यांनी कोरोना ॲडव्हान्स सुविधेचा लाभ घेतला. ही संख्या ईपीएफओ सदस्यांच्या एकूण संख्येच्या एक तृतीयांश पेक्षा जास्त आहे. ही सुविधा २०२०-२१ मध्ये सुरू करण्यात आली होती. या कालावधीत पीएफ ग्राहकांनी कोरोना ॲडव्हान्स म्हणून ४८,०७५.७५ कोटी रुपये काढले.

अहवालानुसार, ईपीएफओने २०२०-२१ मध्ये १७,१०६.१७ कोटी रुपये वितरित केले होते ज्याचा फायदा ६९.२ लाख ग्राहकांना झाला. २०२१-२२ मध्ये ९१.६ लाख ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घेतला असून १९,१२६.२९ लाख कोटी रुपये काढले. त्याचप्रमाणे २०२२-२३ मध्ये ६२ लाख ग्राहकांनी त्यांच्या पीएफ खात्यातून ११,८४३.२३ कोटी रुपये काढले.