मोठी बातमी : माजी खासदार डॉ. हीना गावितांचा भाजपला रामराम

#image_title

नंदुरबार : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत माघारीनंतर सर्वच मतदारसंघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. महायुती व महाविकास आघाडीच्या इच्छुक उमेदवारांना पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याच्या नाराजीमुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून आव्हान दिल्याचे दिसून येत आहे. अशातच नंदुरबारमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी भाजप पक्षाचा राजीनामा दिला आहे. आपण अपक्ष उमेदवारी करत असल्यामुळे पक्षाला कुठलीही अडचण होऊ नये यासाठी मी राजीनामा देत आहे असे त्यांनी म्हटले आहे. 

डॉ. हीना गावित या अक्कलकुवा आक्रनी मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत आहेत. अक्कलकुवा मतदारसंघ हा भाजपला सुटावा यासाठी डॉ. हीना गावित आग्रही होत्या.नंदुरबार विधानसभा मतदारसंघात शिंदे गट मित्रपक्ष असूनही विरोधात काम करत असल्यामुळे मी अक्कलकुवा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी करत असल्याचे त्यांनी म्हटले होते. मी खासदार असताना अक्कलकुवा आक्रनी मतदारसंघात अनेक विकास कामे केलेली आहेत. त्यामुळे मी केलेल्या विकास कामांचा मोबदला मला मतदार मतदानाच्या स्वरूपात देणार आणि मी निवडणूक जिंकणार असेही त्यांनी सांगितले होते. 

नंदुरबारमध्ये भाजपला धक्का

आता डॉ. हिना गावित यांनी भाजप पक्षाचा राजीनामा दिला आहे. अक्कलकुवा आक्रनी मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी करत असल्यामुळे पक्षाला कुठलीही अडचण होऊ नये यासाठी मी पक्षाचा राजीनामा देत आहे. शिंदे गट मित्रपक्ष असूनही वारंवार भाजपाच्या विरोधात काम करत असल्यामुळे मी शिंदे गटाच्या विरोधात अक्कलकुवा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी करत आहे, असे हिना गावित यांनी सांगितले आहे. हिना गावित यांनी भाजपला रामराम ठोकल्याने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच भाजपला नंदुरबारमध्ये मोठा धक्का बसलाय.