मोठी बातमी! महापालिका, न. प.मध्ये ४० हजार पदांची भरती, मुख्यमंत्र्यांचे आदेश

तरुण भारत लाईव्ह । १२ जानेवारी २०२३। राज्यातील सर्व महानगरपालिका , नगरपरिषदा आणि नगरपंचायतीमध्ये ४० हजार विविध पदांच्या भरतीची कार्यवाही तातडीने सुरु करण्याचा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

राज्यातील सर्व महानगरपालिका आणि अ वर्ग नगरपालिकांच्या मुख्यधिकाऱ्यांची परिषद बुधवारी सह्याद्री अथितीगृहात आयोजित करण्यात आली होती, यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषद-पंचायतीमध्ये ५५ हजारांपेक्षा अधिक पदे रिक्त असून,त्यातील राज्यस्तरीय संवर्ग आणि संबंधित नागरी संस्थांमधील ४० हजार विविध पदांची भरती प्रकिया लवकर सुरु करण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या. यावेळी राज्य संवर्गाचे एकूण १९८३ पदे संचालनालयामार्फत व नगरपरिषद – नगरपंचायत स्तरावरील संवर्गात गट क आणि गट ड मध्ये ३७२० पदांची भरती करण्यात येणार आहे, त्याची प्रकिया ३४ जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीमार्फत करण्यात येत आहे तसेच ब्रह्ममुमंबई महानगरपालिकेतील ८४९० पदांची भरती प्रकिया सुरु केली असून, या सर्व भरती प्रक्रियांची कार्यवाही सुरु करून मे अखेर संपूर्ण भरती पूर्ण करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.

बांधकाम परवानगीसाठी ऑनलाइन पद्धती वापरा
डिसेंबर २०२० मध्ये एकात्मिक विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली लागू करण्यात आली असून, त्याअंतर्गत इमारत बांधकाम परवानगीसाठी बीपीएमएस-ऑनलाईन आणि बीपीएमएस टीपी-कलायन्ट वर आधारित  प्रणालीचा वापर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनाही केल्या.

चंद्रपूर महानगरपालिकेचे कौतुक
सर्व २७ शाळा डिजिटल केल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी चंद्रपूर महानगरपालिकेचे कौतुक करून, खाजगी आणि पालिकेच्या शाळामध्ये स्पर्धा निर्माण झाली पाहिजे, असे कार्यक्रम आखण्याचा सूचनाही दिल्या. शिक्षकांच्या कार्यशाळा घेऊन त्यांना प्रशिक्षण द्यावे.शालेय पोषण आहाराचा दर्जा वाढवण्यासाठी पालिकांनी प्रयत्न करण्याची आवश्यकताही मुख्यमंत्र्यांनी नमूद केली.