तरुण भारत। १३ जानेवारी २०२३। राज्यात अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या २० हजारांपेक्षा अधिक पदांच्या भरतीला मान्यता मिळाली असून लवकरच ही भरती सुरु करण्यात येईल. त्याशिवाय मानधनवाढीसह विमा अंगणवाड्यांसाठी वर्ग, नवीन मोबाइल आदी विषयांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी सांगितले.
राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित काल वर्षा निवास्थानी बैठक घेण्यात आली. गुरुवारी अधिकाऱ्यांसह विविध संघटना समितींचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा निवृत्तीच्या एकरकमी लाभ योजनेसाठी एलआयसीकडे शासनाने १०० कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. या संदर्भातील प्रलंबित प्रकरणांवर तात्काळ कायर्वाही करून संबंधितांना पैसे देण्यासाठी भारतीय जीवन विमा महामंडळाकडे पाठपुरावा करण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिल्या.
पोषण आहाराच्या दरात लवकरच वाढ होईल, असा विश्वास व्यक्त करतानाच महत्वाच्या मागण्यांवर लवकरच निर्णय घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.