मोठी बातमी! ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारच्या तिजोरीत ! प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ

#image_title

गेल्या ६ महिन्यांपासून राज्यभरात कोट्यवधी महिलांना लाडक्या बहिणींना दर महिन्याला एक ठराविक रक्कम देणारी, महायुती सरकारची ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ ही आता पुन्हा चर्चेत आली आहे. जुलै महिन्यातील अर्थसंकल्पात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी या योजनेची घोषणा केली. त्याअंतर्गत पात्र ठरणाऱ्या २१ ते ६५ वयोगटातील लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये देण्यात आले. राज्यात आत्तपर्यंत कोट्यावधी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असून डिसेंबरचा हप्ताही काही दिवसांपूर्वीच जमा झाला होता.

मात्र आता याच योजनेबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा करण्यात येत आहे. निकष डावलून ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा’ लाभ घेतलेल्यांवर आता कारवाई सुरू झाली असून त्याअंतर्गतच हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यामुळे अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा करण्यात आली. त्यानुसार, एका लाभार्थी महिलेला मिळालेचे ७५०० रुपये सरकारच्या तिजोरीमध्ये पुन्हा जमा करण्यात आले आहेत.

लाडकी बहीण योजना जाहीर करून जेव्हा ती सुरू झाली, तेव्हा त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी विविध निकष निश्चित करण्यात आले होते. पण विधानसभा निवडणूक जवळ आल्याने सरसकट सर्व अर्ज स्वीकारण्यात आले. या निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं आणि महायुतीचं सरकार पुन्हा स्थापन झालं, त्यामुळे पुन्हा सत्तेत आल्यानंतर लाडकी बहीण योजनेसाठी दिलेल्या अर्जांची पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

‘या’ बहिणीचे पैसे घेतले परत

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेचा आढावा घेतल्यावर सर्व अर्जांची पडताळणी करण्यात येईल, अशी घोषणा महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी केली होती. त्यानुसार ही पडताळणी सुरू झाली. त्याच दरम्यान आता धुळ्यातील एक महिलेचे पैसे परत घेण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, धुळ्यातील नकाने गावातील एका महिलेचे ७५०० रुपये परत घेण्यात आले आहेत. धुळ्यातील या महिलेने सरकारी योजनेचा दुबार लाभ घेतल्याचे चौकशीत आढळले, त्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली असून लाडकी बहीण योजनेअंतर्गत तिला आत्तापर्यंत देण्यात आलेले ५ महिन्यांचे साडेसात हजार रुपये परत घेण्यात आले असून ते सरकारजमा करण्यात आले.

मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेची पडताळणीला सुरुवात झाली आहे. धुळे जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे ५ लाख १४ हजार अर्ज भरण्यात आले होते. त्यापैकी सुमारे ४ लाख ९० हजार महिलांना लाडकी बहीण योजमेचा लाभ मिळून पैसे खात्यात जमा झाले होते. या योजनेतील अर्जाची पडताळणी सुरू झाल्यावर अनेक महिलांनी दिलेल्या कागदपत्रांची छाननी सुरू झाली. त्याच दरम्यान नकाने गावातील एका महिलेने या योजनेचा दुबार लाभ घेतल्याचे समोर आल्याने तिचे ७५०० रुपये परत घेण्यात आले. मात्र हे प्रकरण पूर्वीचं असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांचे म्हणणं आहे.