शिवसेनेचे (शिंदे गट) खासदार रवींद्र वायकर यांना उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. खासदार रवींद्र वायकर यांच्या विजयाला आव्हान देणारी शिवसेना (UTB) उमेदवार अमोल कीर्तीकर यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
मतमोजणीत फेरफार करून रवींद्र वायकर यांना विजयी घोषित केल्याचा आरोप कीर्तिकर यांनी केला होता. न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या एकल खंडपीठाने हा निर्णय दिला. न्यायालयाने अमोल कीर्तीकर यांची याचिका फेटाळून लावली. उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे अमोल कीर्तिकर यांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र पोस्टल मतमोजणीत वायकर यांना ४८ मतांनी विजयी घोषित करण्यात आले.
काय होते प्रकरण ?
मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणी अमोल किर्तीकर EVM मतमोजणीत एका मताने आघाडीवर होते. मात्र पोस्टल मतमोजणीत ४८ मतांनी वायकर यांचा विजय झाला. यात वायकर यांना ४ लाख ५२ हजार ६४४ मते, तर किर्तीकर यांना ४ लाख ५२ हजार ५९६ मते मिळाली. उत्तर-पश्चिम मतदारसंघातील खासदार म्हणून वायकरांची निवड रद्दबातल करावी, तसेच, आपल्याला निर्वाचित उमेदवार म्हणून घोषित करण्याची मागणी कीर्तीकर यांनी निवडणूक याचिकेतून केली होती.
अमोल कीर्तीकर यांनी याचिकेची मांडणी योग्यरित्या करण्यात आलेली नाही. तसेच टेंडर मते ही विजयी उमेदवाराला कशी मिळाली हे दाखविण्यास कीर्तीकर अपयशी ठरले, त्यामुळे, त्यांची याचिका फेटाळून लावावी असा दावा रविंद्र वायकर यांच्यावतीने करण्यात करण्यात आला होता. हा दावा न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या एकलपीठाने योग्य ठरवत किर्तीकर यांची याचिका फेटाळली.
९ जुलैला अमोल कीर्तिकर यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्यासमोर सुनावणी झाली होती, त्यावेळी न्यायालयाने खासदार रवींद्र वायकर यांच्यासहित मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील सर्व १ ९ उमेदवारांना समन्स पाठवून वायकर आणि इतरांना बाजू मांडण्याचे निर्देश दिले होते.