मुक्ताईनगर : मुक्ताईनगर शहरातील बोदवड चौफुलीवरील उड्डाणपुलावर ट्रॅक्टर घेऊन जाणाऱ्या कंटेनरने दुचाकीला धक्का दिल्याने दुचाकीस्वार कंटेनरच्या चाकाखाली आल्याने जागीच ठार झाला तर ठी मागे बसलेला तरुण जखमी झाला. हा अपघात मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडला. अनिल छोटू डागोर (४९, रा. रामदेव बाबानगर, मलकापूर, जि. बुलढाणा) असे मयताचे तर अभिषेक टाक असे जखमीचे नाव आहे. कंटेनर चालकाविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
कंटेनरच्या धक्क्याने अपघात
सूत्रांच्या माहितीनुसार, डागोर हे मित्र अभिषेकसोबत स्कूटीने मलकापूरकडून भुसावळकडे जात असताना बोदवड चौफुलीवर कंटेनरने धक्का दिल्याने दुचाकी घसरली व क्लीनर भागाच्या मागच्या चाकाखाली दुचाकी आल्याने अनिल डागोर यांचा जागीच मृत्यू झाला तर अभिषेक टाक थोडक्यात बचावले. मात्र तेही जखमी झाले आहेत. या घटनेने महामार्गावर काही वेळ वाहतुकीची कोंडी झाली होती. घटनास्थळी मुक्ताईनगर पोलिसांनी धाव घेतली. मृतदेह मुक्ताईनगर ग्रामीण रुग्णालयात आणला. मृत अनिल डागोर मलकापूर येथे रेल्वेस्थानकाच्या साफसफाईचा ठेका घेऊन आपला उदरनिर्वाह करीत असल्याचे समजते. अभिषेक शरद टाक (२१, मलकापूर) यांच्या तक्रारीवरुन कंटेनर चालक सोहन सिंग भगवानसिंग (३३, आरडीबी करीयर, जयपूर राजस्थान, रा. पचेरी कला, ता. बुहाना) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार चव्हाण करीत आहेत.
भुसावळातील कुलहोम्स अपार्टमेंटमध्ये घरफोडी
भुसावळ : शहरात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्या-घरफोड्यांचे सत्र कायम आहे. बंद घरांनाच चोरट्यांकडून टार्गेट केले जात असल्याने रहिवासी धास्तावले आहेत. शहर हद्दीतील कमल गणपती हॉलजवळील कुलहोम्स अपार्टमेंटमध्ये चोरट्यांनी बंद प्लॅटचे कुलूप तोडून घरातील कपाटातून एक हजार दोनशे रुपयांची रोकड लांबवली. याप्रकरणी शहर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. रेल्वे कर्मचारी हेमंत शिवाजी आभाळे (३२, कुलहोम्स अपार्टमेंट, भुसावळ) यांनी शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, १६ ते २५ दरम्यान गावाला गेल्यानंतर प्लॅटच्या मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी प्रवेश करीत हॉलमधील सामानाची फेकाफेक केली तसेच बेडरूममधील कपाटाचे लॉक तोडून त्यातील एक हजार दोनशे रुपयांची रोकड लांबवली. २५ रोजी गावाहून आल्यानंतर घरफोडीचा प्रकार उघडकीस येताच आभाळे यांनी शहर पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली. तपास पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप पालवे करीत आहेत.