Bike Riding : सावधान! ..तर होणार गुन्हे दाखल

तरुण लाईव्ह न्यूज । २२ डिसेंबर २०२२ । ‘धूमस्टाईल’ बाईक रायडिंग अन्‌ कर्णकर्कश आवाजाचे मॉडिफिकेशन केलेल्या सायलेंसरच्या धडकी भरविणाऱ्या आवाजाच्या दुचाकी विरोधात कारवाई करण्याची मागणी होत आहे, अखेर नाशिक शहर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. नवनियुक्त पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी याबाबत आयुक्तालय हद्दीतील पोलिस अधिकाऱ्यांना धारेवर धरत थेट कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

धूमस्टाईलने भरधाव वेगात धावणाऱ्या आणि कर्णकर्कश आवाज करणाऱ्या स्पोर्ट्स बाईक बाजारात दाखल झाल्या आहेत. या स्पोर्ट्स बाईक अत्यंत महागड्या असल्याने त्या काही मोजक्याच युवकांकडे आहेत. शहरातील असेच काही स्पोर्ट्स बाईक चालविणारे बाईक रायडर्स रात्री मायको सर्कलकडून त्र्यंबक रोडने सातपूर गावाच्या दिशेने धूमस्टाईल बाईक राईड करतात.

असेच प्रकार कॉलेज रोड, गंगापूर रोड, दिंडोरी रोड यासह सिडको, सातपूर, अंबड, पंचवटी, नाशिक रोड या उपनगरी भागात भरधाव वेगात आवाज करीत धावत सुटतात. या बाईकच्या आवाजाने वाहन चालविणाऱ्या चालकांमध्ये मात्र भितीचे धडकीच भरते. अत्यंत भरधाव वेगात हे बाईकस्वार दुचाक्या तिरक्या करीत सुसाट वेगात सुटल्याने आजूबाजूच्या वाहनचालकांमध्ये अक्षरश: धडकीच भरते.

तसेच, रहिवासी परिसरातूनही रात्री कर्णकर्कश आवाज करीत धावतात तेव्हा सर्वसामान्य नागरिकांनाही त्याचा त्रास होतो. याबाबत काही जागरूक नागरिकांनी पोलिसांकडे तक्रारीही केल्या, परंतु त्यावर कोणतीही कारवाई होत नव्हती. दरम्यान नवनियुक्त आयुक्त अंकुश शिंदे यांच्या निदर्शनास सदर बाब आल्याने त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना धारेवर धरत बाईक रायडर्सवर थेट कारवाई करण्याचे आदेश बजावले आहेत.

पुन्हा तोच बाईक रायडर कारवाईत सापडला तर त्यावर गुन्हा दाखल करण्याचेही आदेश आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे बाईक रायडर्सचे धाबे दणाणले असून शहरभर पोलिसांनी नाकाबंदी सुरू केली आहे.