---Advertisement---
गेल्या काही वर्षांत आपल्याला ज्या अपयशांना सामोरे जावे लागले, ते दोन्ही देशांच्या लोकांच्या हिताचे नव्हते. सीमा वाद आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत भेटून आनंद झाला. या दोऱ्यामुळे भारतासोबत द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत होईल याची मला आशा आहे, असे चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी म्हणाले.
गेल्या ऑक्टोबरमध्ये कझानमध्ये दोन्ही देशांच्या नेत्यांनी चर्चेला पुढे नेण्याचा निर्णय घेतला, तेव्हापासून आम्हाला खूप फायदा झाला आहे. सध्या निर्माण झालेल्या नवीन वातावरणामुळे आम्ही ज्या विविध क्षेत्रांवर काम करत आहोत त्यामध्ये पुढे जाण्यास मदत झाली आहे. मला मनापासून आशा आहे. की २४ वी विशेष प्रतिनिधी पातळीची चर्चा मागील चर्चेइतकीच यशस्वी होईल, असे वांग यी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.
सीमांवर जी स्थिरता आली आहे ते पाहून आम्हाला खूप आनंद होत आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस झालेल्या विशेष प्रतिनिधींच्या चर्चेचा २३ वा टप्पा खूप चांगला होता. त्या बैठकीत आम्ही मतभेद दूर करण्यासाठी, सीमा स्थिर करण्यासाठी आणि तोडग्याकडे वाटचाल करण्यासाठी एकमत झालो. भारतीय बाजूचे विशेष प्रतिनिधी म्हणून अजित डोभाल यांच्या प्रयत्नांचे मी कौतुक करतो. द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी आणि विकसित करण्यासाठी आता एक महत्त्वाची संधी दोन्ही देशाकडे आहे.
बहुध्रुवीय जागतिक व्यवस्था गरजेची : एस. जयशंकर
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले, वांग यी यांचा दौरा द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेण्याची संधी आहे. परस्पर आदर, परस्पर संवेदनशीलता आणि परस्पर हित यावर आमच्यात चर्चा झाली. आम्हाला एक निष्पक्ष, संतुलित आणि बहुध्रुवीय जागतिक व्यवस्था हवी आहे, ज्यामध्ये बहुध्रुवीय आशियाचाही समावेश आहे.
आम्ही अमेरिकेच्या धमक्यांना घाबरत नाही
अमेरिकेच्या दबावाचा उल्लेख करताना वांग यी म्हणाले, आम्ही कुणाच्याही धमक्यांना घाबरत नाही. अमेरिकेमुळे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेला गंभीर आव्हानांचा सामना करावा लागत आहे. दोन सर्वात मोठे विकसनशील देश चीन आणि भारत एकत्र आल्यास जागतिक स्थिरता कायम राखण्यास मदत होईल.