जैवविविधता आणि मानवी जीवन !

प्रासंगिक

 

– डॉ. प्रीतम भि. गेडाम

 

पृथ्वीवरील मानवी जीवन जर सुरळीत चालायचे असेल तर जैवविविधता जपणे अतिशय महत्त्वाचे आहे. मोठ्या प्राण्यांपासून कीटकांपर्यंत, पृथ्वीवरील जीवनाची विशाल विविधता मानवी जीवनात आणि कल्याणासाठी खूपच योगदान देते. ५० हजार वन्य प्रजाती जगभरातील अब्जावधी लोकांच्या गरजा पूर्ण करतात.   जगातील ५ पैकी १ व्यक्ती उत्पन्न आणि अन्नासाठी वन्य प्रजातींवर अवलंबून आहेत, तर २.४ अब्ज लोक अजूनही स्वयंपाकासाठी लाकडाच्या इंधनावर अवलंबून आहेत. अनेक फायदेशीर वनौषधींची झाडे, वनस्पतीही लुप्तप्राय प्रजातींच्या गटात आली आहेत.   गेल्या ४० वर्षांत, वन्य प्रजातींच्या संख्येमध्ये सरासरी ६० टक्के घट झाली आहे. सध्या १० लाखांहून अधिक प्रजाती धोक्यात आहेत.   आज अस्तित्वात असलेले वन्यजीव, प्रजाती आणि जलचर यांच्याविषयी जागरूकता वाढवणे प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे. पृथ्वीवरील मानवी जीवन टिकून राहण्यासाठी वन्यजीवांचे संवर्धन अत्यंत महत्त्वाचे आहे.

 

माणसाची लोभीवृत्ती शिगेला पोहोचली 

आपल्या सर्वांना माहीत आहे की, माणसापेक्षा लबाड, लोभी, स्वार्थी असा दुसरा प्राणी जगात नाही. आज प्रत्येक माणूस स्वत:च्या फायद्यासाठी संघर्षात गुंतलेला दिसतो, जरी त्याच्या स्वार्थामुळे अनेक निष्पाप लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले तरी चालेल. गावे उद्ध्वस्त होऊन शहरांकडे वेगाने स्थलांतर होत आहे, शहरे महानगरांचे भव्य रूप धारण करीत आहेत.   शहरांच्या आजूबाजूच्या खेड्यातील सुपीक शेतीत पिकांच्या जागी आता मोठमोठ्या आलिशान इमारती बांधल्या जात आहेत. प्रदूषण, भेसळ, जंगलतोड, यांत्रिक साधनांचा अतिवापर, नैसर्गिक साधनसंपत्तीचे अतिशोषण यामुळे पर्यावरणाचे चक्र बिघडत आहे.   आज माणसाला घर-अंगणात मोकळी जागा किंवा झाडे नकोत, तर अधिकाधिक काँक्रिटच्या खोल्या हव्या आहेत, त्यासाठी इतरांच्या जागेवर अतिक्रमण करावे लागले तरी त्यांना चालेल.   आजचा स्वार्थी माणूस आपल्या चुकीच्या वर्तनाची शिक्षा संपूर्ण पर्यावरण आणि सजीव वर्गाला देत आहे. निसर्गाशी छेडछाड केल्याने ग्लोबल वॉर्मिंग, ओझोन थराची समस्या, वाढते तापमान, अन्नसुरक्षेचा अभाव, पूर आणि दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, वाढते गंभीर आजार हे अशा लोकांच्या चुकीचे परिणाम आहेत.   उदाहरणार्थ, जगात लोकसंख्येच्या कितीतरी अधिक मोबाईल बनवले आहेत, पण गरजेनंतर हे कोट्यवधी मोबाईल पर्यावरणाला कोणतीही हानी न पोहोचवता शंभर टक्के योग्यरीत्या व्यवस्थित (रिसायकल) केले जातील का?

 

वन्यजीव व मानव   

या आधुनिक युगाकडे पाहिल्यास असे दिसते की, मानव हा जीवन देणारा निसर्गाचा भक्षक आणि वन्यजीव अनादिकाळापासून निसर्गाच्या रक्षकाच्या भूमिकेत सक्रियपणे गुंतलेले आहेत. प्रत्येक मानवाला माहीत आहे की, जगण्यासाठी सर्वात आवश्यक शुद्ध हवा, पाणी आणि अन्न ही निसर्गाची देणगी आहे; त्याशिवाय मानवी अस्तित्व असू शकत नाही.   तरीही जीवन देणा-या या सुंदर निसर्गाला वाचवण्याऐवजी लोक स्वार्थापोटी त्याची हानी करण्यात गुंतले आहेत. वन्यजीव हवामान बदलाचे संरक्षण करून पोषक समृद्ध अन्न स्रोत राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे जैवविविधता पारिस्थितिकी तंत्र अधिक चांगले कार्य करते. मातीची गुणवत्ता आणि सुपीकता सुधारते. वन औषध, व्यवसायासाठी कच्चा माल, शुद्ध हवा, पाणी उपलब्ध आहे. पर्यावरण सुधारण्यात सर्व वन्यजीव मोलाची भूमिका बजावतात.   कोरोना टाळेबंदीच्या काळात जेव्हा जगातील मानवनिर्मित संसाधनांचा वापर थांबून त्यात मानवी हस्तक्षेप पूर्णपणे बंद होता, तेव्हा हा जीवन देणारा निसर्ग वन्यजीवांच्या साहाय्याने स्वत:मध्ये झपाट्याने सुधारणा करीत होता, म्हणजेच मानवी जीवनासाठी आवश्यक असलेले नवीन आयाम तयार करीत होता.   सुंदर निसर्गाचे ते अलौकिक दृश्य त्यावेळी पाहायला मिळाले जे आपल्या जीवनासाठी सर्वात मौल्यवान आहे.

 

आजकाल वन्यप्राण्यांचे अपघात, वन्यप्राणी आणि मानव संघर्ष, सततच्या मृत्यूच्या बातम्या मिळतात. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, या २०२३ वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत देशात वाघांच्या मृत्यूची संख्या सर्वाधिक ३० वर पोहोचली आहे, जी अत्यंत चिंताजनक आहे, देशाच्या राष्ट्रीय प्राण्याचे हे वास्तव आहे. दरवर्षी जंगलाचे घनदाट क्षेत्र कमी होत असून मानवी वस्ती झपाट्याने वाढत आहे.   अनेक वेळा उन्हाळ्यात सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेला बुद्धिमान प्राणी माणूसदेखील पाणी आणि हिरवाईसाठी भटकताना दिसतो. लोकप्रतिनिधी, प्रसारमाध्यमे, प्रशासन, मंत्रालय, न्यायालय अशी व्यवस्था मानवाच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी आहे, तरीही अनेक परिस्थितीत माणूस हतबल दिसतो. वन्यजीवांच्या गरजा मानवाच्या गरजांइतक्या अमर्याद नाहीत. वन्य क्षेत्रात वाढता मानवी हस्तक्षेप ही वन्यप्राण्यांची सर्वात मोठी समस्या आहे.   आज लोकांना निसर्गाच्या कुशीत, जंगलात आयुष्याचे सुखाचे क्षण घालवण्यासाठी फार्म हाऊसची गरज आहे, पण त्या जीवनदायी निसर्गाच्या संवर्धनाची जबाबदारी मात्र नको आहे. वन्यप्राण्यांच्या भूक-तहानचा प्रश्न सुटला आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाला हानी पोहोचली नाही, तर तेही त्यांच्या अधिवास क्षेत्रात नैसर्गिकरीत्या जगू शकतील.   माणसाने निसर्गाकडून जेवढे आवश्यक आहे तेवढेच घ्यावे आणि कालांतराने ते निसर्गाकडे परत करीत चालले पाहिजे; जेणेकरून येणा-या पिढ्यांनाही पृथ्वीवर मुक्तपणे जगता येईल. निसर्गासमोर आपण सगळे शून्य आहोत, वन्यजीवांचा अंत म्हणजे मानवी जीवनाचा अंत.   निसर्ग हा जीवनाचा स्रोत आहे आणि निसर्गाच्या संरक्षणासाठी वन्यजीव आवश्यक आहे. त्यामुळे माणसाला आपले अस्तित्व टिकविण्यासाठी वन्यजीव व जैवविविधता वाचवावी लागेल.

८२३७४१७०४१