जळगाव : मुलगा मुलगी एक समान मानून एका मुलीनंतर दुसरे अपत्य होऊ न देता मुलीला वंशाचा दिवा मानून तिलाच मुलासमान वागणूक देणाऱ्या माता पित्यांचा आणि मुलींचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सन्मान करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमातंर्गत राज्यभरात राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी महिलांनी घरी जाऊन एकच मुलगी अपत्य असणाऱ्या आईवडिलांचा आणि मुलींचा सत्कार केला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या कल्पनेतून राबवण्यात आलेल्या या उपक्रमाला राज्यभरात प्रतिसाद लाभला यात प्रामुख्याने नागपुर, चंद्रपूर ,धुळे, सांगली ,नाशिक, मुंबई अशा राज्याच्या सर्वच भागात महिला पदाधिकऱ्यांनी एकच मुलगी अपत्य असणाऱ्या आईवडिलांचा सन्मान केला.
या उपक्रमाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल माहिती देताना रोहिणी खडसे म्हणाल्या स्त्रियांचे अस्तित्व चुल मुलापर्यंत मर्यादित असण्याच्या काळात स्त्रियांच्या पंखाला बळ दिले तर त्या गगनभरारी घेऊ शकतात अशी खात्री असल्याने शरद पवार यांनी आरक्षणाच्या माध्यमातून स्त्रियांच्या हातात झेंड्याची दोरी दिली. मुलाला वंशाचा दिवा मानण्याचा आणि मुलाने अग्निडाग दिल्याशिवाय मोक्ष मिळत नाही अशा कर्मठ विचारसरणीच्या काळात शरद पवार यांनी मुलगा मुलगी भेद न करता सुप्रिया सुळे यांच्या जन्मानंतर दुसरे अपत्य होऊ न देता समाजापुढे एक आदर्श निर्माण केला. खा.सुप्रिया सुळे यांनी सुद्धा “श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचे पाणी” या उक्तीप्रमाणे शरद पवारांची प्रत्येक वेळी खंबीर साथ देत आपल्या कार्यकर्तृत्वाने शरद पवार यांचा विश्वास सार्थ ठरवला.
राज्यभरात महिला पदाधिकाऱ्यांनी एक मुलगी अपत्य असणाऱ्या आईवडिलांचा, मुलींचा सन्मान केला यातून समाजातील इतर परिवारांना प्रेरणा मिळून समाजासमोर मुलगा मुलगी भेदभाव न करता मुलींना सुद्धा समान वागणुक दिली शिक्षण दिले तर त्या सुद्धा आपले कर्तृत्व सिद्ध करू शकतात. आई वडिलांच्या म्हातारपणीची काठी होऊ शकतात, असा संदेश गेल्याचे रोहिणी खडसे यांनी सांगितले.