महाराष्ट्रात विधान परिषदेच्या पाच जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. येत्या २७ मार्च रोजी ही निवडणूक पार पडणार असून उद्या उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. यात भाजप सर्वाधिक तीन जागा लढवणार आहे. भाजपच्या केंद्रीय कार्यालयाकडून आज विधान परिषदेसाठी तीन उमेदवारांची नाव जाहीर करण्यात आली आहेत.
महायुतीत भाजपच्या वाट्याला तीन जागा आल्या आहेत. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. या तीन जागांसाठी भाजपकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्यामध्ये दादाराव केचे, संजय केणेकर आणि संदीप जोशी यांना संधी देण्यात आली आहे. या तिन्ही नेत्यांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आहे.
संजय केनेकर हे छत्रपती संभाजीनगरमधून येतात. त्यांनी पक्षाचे महामंत्री म्हणून उत्तम काम केलेलं आहे. दादाराव केचे यांना विधानसभेच्यावेळी तिकीट नाकारण्यात आलं होतं. म्हणून त्यांची आता विधान परिषदेवर वर्णी लागली आहे. तर संदीप जोशी हे नागपूरचे माजी महापौर आहेत.
मोठी बातमी! विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून ‘या’ तीन उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब
