मुक्ताईनगर, गणेश वाघ : राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर इच्छुक कामाला लागले आहेत. दोन आमदार व एक मंत्री असलेल्या म क्ताईनगरात यंदा सर्वाधिक चुरशीचा सामना रंगणार आहे. महाविकास आघाडीने यापूर्वीच अॅड. रोहिणी खडसे यांना तिकीट जाहीर केल्याने त्यांनी प्रचाराचा झंझावात सुरू केला आहे, मात्र महायुतीकडून ही जागा शिवसेना शिंदे गटाला सुटणार की भाजप ही जागा स्वतःजवळ ठेवून चंद्रकांत पाटील यांचा भाजपात प्रवेश करून तिकीट देणार? यावरून सध्या खल सुरू असल्याचे राजकीय सूत्रांचे म्हणणे आहे. अपक्ष म्हणून निवडून आलेले आमदार चंद्रकांत पाटील यांनी गेल्या पाच वर्षात कोट्यवधींची विकासकामे केली असून, मुक्ताईनगरात ते षड्डू ठोकून रिंगणात उतरले आहेत. सोमवारी त्यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांनी सभा घेत चंद्रकांत पाटील हे महायुतीचे उमेदवार असल्याची घोषणाही करीत कार्यकर्त्यांना बळ दिले.
तुल्यबळ अपक्ष चुरशीची निवडणूक
मुक्ताईनगर मतदारसंघात महाविकास आघाडीविरुद्ध महायुती अशी सरळ लढत अपेक्षित असली तरी दणकट अपक्ष उमेदवार रिंगणात आल्यास चुरशीचा सामना रंगेल यात शंकाच नाही. २४ ऑक्टोबर रोजी गुरुपुष्पामृताचा मुहूर्त आहे. तोंडावर मुहुर्त असल्यावरसुद्धा अद्याप आघाडी व युतीचे उमेदवार जाहीर झालेले नाहीत. विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. राज्यात सत्तांतर झाल्याने ते शिंदे समर्थक आमदार झाले. आता युती जरी असली तरी भाजप मुक्ताईनगर विधानसभा मतदासंघावरील आपला हक्क सोडत नसल्याची आतील गोटातील चर्चा आहे. महा, युतीकडून आमदार चंद्रकांत पाटील यांची दावेदारी शंभर टक्के असली तरी ते शिंदे यांच्या शिवसेनेकडून लढतात की भाजपच्या तिकिटावर रिंगणात उतरतात ? हेदेखील लवकरच स्पष्ट होणार आहे. लढत मात्र अॅड. रोहिणी खडसे विरुद्ध चंद्रकांत पाटील अशीच रंगणार असून सध्या तरी भाजपने उमेदवारीबाबत द्विस्ट आणल्याचे जाणकार सांगतात.
लाडक्या आमदाराच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री मुक्ताईनगरात
मुख्यमंत्री शिंदे यांचे अत्यंत जवळचे आमदार म्हणून चंद्रकांत पाटील परिचित आहेत व त्याच कारणास्तव सोमवारी त्यांनी मुक्ताईनगरात सभा घेत कार्यकर्त्यांना बळ दिले व चंद्रकांत पाटील यांना महायुतीचा उमेदवार घोषित केले मात्र महायुतीने त्यांना शिंदे गटातील तिकीट मिळणार की भाजपच्या गटातून हे अद्याप अस्पष्ट आहे.
भाजपच्या बालेकिल्ल्यात अपक्ष आमदार विजयी
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी नेतृत्व केलेला हा मतदारसंघ ३० वर्ष भाजपचा बालेकिल्ला होता. भाजपच्या अंतर्गत कलहामुळे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी गेल्या निवडणुकीत भाजप उमेदवार रोहिणी खडसे यांचा पराभव केला व भाजपच्या हातातून हा मतदासंघ निसटला. मुक्ताईनगर मतदारसंघात मुक्ताईनगर तालुक्यातील ८१ गावे तर बोदवड तालुक्यातील ५२ व रावेर तालुक्यातील ४० गावांचा समावेश आहे.
असे आहेत एकूण मतदार
मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात एकूण मतदार तीन लाख दोन हजार २७१ आहेत. यात महिला मतदार एक लाख ४७ हजार ६३७ तर पुरुष मतदार एक लाख ५४ हजार ६२५ तर तृतीयपंथी नऊ मतदार आहेत.