तरुण भारत लाईव्ह न्यूज । ६ एप्रिल २०२३ । लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या आवाहना नुसार 1977 साली जनसंघाचे त्या वेळच्या जनता पार्टीमध्ये विलीनीकरण झाले होते. मात्र तथाकथित दुहेरी निष्ठेच्या मुद्यावरून जनता पार्टीतील जनसंघाच्या मंडळींची सातत्याने अवहेलना आणि मानहानी होत असल्याने जनसंघाच्या शिर्षस्थ नेत्यांची दिल्लीत बैठक होऊन भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेचा निर्णय झाला.
अटलजी,अडवाणी जी, कुशाभाऊ ठाकरे, राजमाता विजयाराजे शिंदे, आदी राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांसोबत महाराष्ट्रात नानासाहेब उत्तमराव पाटील, वसंतराव भागवत, हशू आडवाणी, रामभाऊ म्हाळगी, मोतीरामजी लहाने या जनसंघाच्या नेते मंडळींवर महाराष्ट्राची धुरा होती. जळगाव जिल्ह्यात जनसंघाचे काळापासून चंद्रकांतजी मेंडकी काका हे पुर्णवेळ कार्यकर्ते म्हणून संघटनमंत्री पदावर कार्यरत होते. महाराष्ट्र प्रदेश भाजपचे राजकीय चाणक्य म्हणून ओळखले जाणारे स्व. वसंतराव भागवत यांनी चंद्रकांत मेंडकी यांना पुन्हा एकदा जिल्हा संघटक म्हणून भाजपाची जबाबदारी सोपवली. चाळीसगावचे अॅड. शिवाजीराव पालवे, भुसावळचे कानजी प्रेमजी जोशी, राजाभाऊ पवार, तत्कालीन एदलाबाद ( मुक्ताईनगर ) चे अशोकराव फडके, डॉ. ताराचंद जैस्वाल, रामभाऊ खोरखेडे बोदवडमध्ये स्व.कालीदास कुळकर्णी यावल तालुक्यातील सुर्यभान अण्णा पाटील, डॉ. गोकुळ नेवे, चोपडा तालुक्यातील शांताराम पाटील, डॉ. गोकुळ नेवे, जळगावचे प्रा. शामकांत कुळकर्णी, गजूशेठ जोशी, केशवराव भोईटे आदी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बळीराम पेठेतील चांदोरकर वाड्यातील जनसंघाच्या जुन्या कार्यालयात झाली.
पुर्वीच्या जनसंघ या राजकीय पक्षाचे आजचे विराट स्वरुप म्हणजे भारतीय जनता पार्टी ही ओळख आता सार्वत्रिक झालेली आहे. 6 एप्रिल हा भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस – वर्धापन दिवस साजरा करीत असताना 42 वर्षा पूर्वी जळगाव जिल्ह्यात भाजपाची स्थिती कशी होती हे पहाणे औत्सुक्य पूर्ण आहे.
जिल्हाध्यक्ष म्हणून रावेर तालुक्यातील सावदा येथील प्रतिथयश डॉक्टर गुणवंत रामभाऊ सरोदे यांची निवड करण्यात आली. डॉ. सरोदे यांचं कुटुंब तसं काँग्रेसी विचारसरणीचे. परंतु गुणवंतराव हे सर्वोदयी पुरस्कर्ते असल्याने ते जनता पार्टीमध्ये कार्यरत होते. जिल्ह्यातील जनसंघाच्या मंडळींच्या संपर्कात आल्यावर, या देशाला परंवैभवाप्रत नेण्यासाठी भारतीय जनता पार्टी हा एकमेव पर्याय आहे हे ओळखून त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला.
जिल्हा अध्यक्ष डॉ. गुणवंराव सरोदे यांची पांढर्या रंगाची जुनी अँब्येसेडर कार. त्या 998 नंबर च्या मोटारीने सरोदे आणि मेंडकी या जोडीने संपूर्ण जळगाव जिल्हा पिंजून काढत जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीची उभारणी आणि बांधणी केली. जिल्ह्यात एकीकडे काँग्रेसची सर्वदूर पाशवी सत्ता आणि दुसरीकडे नव्याने स्थापन झालेल्या पक्षाच्या कामाची झिंग! साधनांची कमतरता, मोजक्या पण जिद्दीच्या कार्यकर्त्यांच्या बळावर जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी ची घौडदौड सुरू झाली.
अनेकांचा लागला हातभार
भुसावळ मध्ये वर उल्लेख केलेल्या पदाधिकार्यांबरोबरच शांतीलाल सुराणा, बाकेलालजी रणधीर, अरूण भावसार, सुरेश शर्मा, ओक बंधू आदी कार्यकर्ते जोमाने कामाला लागले. अमळनेर मध्ये देशराज जी अग्रवाल, श्रीमती शुभदाताई करमरकर, सुभाष अण्णा चौधरी पाचोरा येथील नाना वाणी, संघवी, मोर ही मंडळी. एरंडोल येथे डॉ वा. पू. जोशी, धरणगावात डॉ. तिवारी यांनी सुरुवातीला किल्ला लढवला. जामनेर तालुक्यात आनंदराव पाटील, डॉ. दिगंबर बारी, उत्तमराव थोरात हरीभाऊ बारी शेरू काझी, बाबूराव घोंगडे, अॅड. शिवाजी सोनार, मधुकर बारी या मंडळींनी भारतीय जनता पार्टीचे ध्येय धोरणे रुजविण्यासाठी हिरीरीने प्रयत्न केलेत.
चाळीसगाव मध्ये पालवे वकील, वाडीलाल राठोड, वसंतराव चंद्रात्रे, तुकाराम गवळी प्रितमशेठ रावलानी हे प्रमूख पदाधिकारी होते. पारोळा तालुक्यातुन जनसंघाचे पहिले आमदार म्हणून स्व. श्रीनिवास भाऊ अग्रवाल हे 1957 मध्ये निवडून आले होते. सुरुवाती पासूनच पारोळा तालुका जनसंघ आणि पुढे भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो जुन्या काळात स्व. सुधाकर तांबे, लोटूभाऊ महाजन, शिवाभाऊ साळी, कनकलालजी जैन माजी नगराध्यक्ष मुरलीधरजी दाणेज आदी प्रमुख कार्यकर्त्यांची समर्थ साथ होती. त्या वेळच्या एदलाबाद तालुक्यात जनसंघाचे मजबूत संघटन होते. स्व. बाबासाहेब अशोकराव फडके, डॉ जैस्वाल, दगडू आबा राठोड, कमल किशोर गोयंका, भाईजी पुरणमल चौधरी वासुदेव पाटील, रामदास नेमाडे, तात्या ढमढेरे, राजाभाऊ न्हावी, आनंदा कांगडू महाजन, चंपालाल जी जैन, गोविंदराव चौधरी, रसाल दलपत पवार, दलपत जाधव या जनसंघाच्या जुन्या जाणत्या बिनीच्या शिलेदारांनी मुक्ताईनगर तालुक्यातील गावागावात राजकीय क्षितिजावर नव्याने उमललेल्या कमलपुष्पाचे-भाजपाचे संघटन उभे केले. नवीन नवीन उमदे कार्यकर्ते जोडले. अशा प्रकारे जवळपास सर्वच ठिकाणी तालुक्यात पक्षाचा विस्तार होत गेला. यावल तालुक्यात सुर्यभान अण्णा पाटील यांना किशोर कुलकर्णी, लक्ष्मण अण्णा नेवे डॉ. गोकुळ नेवे यांची भक्कम साथ लाभली.
जळगावात नेत्यांचा राबता
जळगाव हे जिल्ह्याचे केंद्र असल्याने जळगावात पार्टीच्या केंद्रीय तसेच प्रदेश पातळीवरील नेते मंडळींचा राबता असायचा. शहरात महिला आघाडीच्या कार्यकर्त्या माजी नगरसेविका श्रीमती कमलाबाई प्रभुदेसाई, जोगदेव वहीनी धडाडीने आणि निर्भिडपणे काम करीत. त्यांचे सोबत दत्तोपंत पाटील, रघुजी निकम, सत्यनारायण व्यास, अशोक नेवे, राजाबापू शिंदे, वसंतराव भोईटे, काशीनाथजी व्यास, शंकरराव पाटील, भैय्या काका पाटील, दगडूकाका खडके, घोगरबुवा इंगळे, रुपचंद मिस्त्री, माधवराव सोनवणे, सोमाभाऊ सपकाळे, सत्यनारायण पुरोहित मुकुंदराव मेटकर, तिवारी या मंडळींनी नव्याने स्थापन झालेल्या भाजपा चा झेंडा खांद्यावर घेऊन नव्या पक्षाचे निवडणूक चिन्ह – कमळाचे फूल घरा घरात पोहचवण्यासाठी अपार कष्ट केले. सुरवातीच्या काळात प्रदेश कार्यालयाकडून ठाण्याचे माजी आमदार गजाननराव कोळी तसेच वसंतराव खेर, डॉ शांताराम बापू करमळकर आदी नेते संपर्क ठेवून होते.
भारतीय जनता पार्टी च्या स्थापने नंतर 1985 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात भाजपाचा पहिला आमदार निवडून आला. तत्कालीन जिल्हा अध्यक्ष डॉ. गुणवंतराव सरोदे हे रावेर मतदारसंघातून विजयी झाले. आणि त्या नंतर निरनिराळ्या तालुक्यातील होतकरू राजकारण्यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेशासाठी रांग लावली असे म्हटले तर वावगे होणार नाही.
याच सुरवातीच्या काळात मी वयाने लहान असुनही स्व. मेंडकी काका यांचे समवेत राहील्याने त्यांच्या कडून मला ही खूप काही शिकायला मिळाले. जिल्ह्यातील भाजपाच्या जवळपास सर्वच प्रमुख कार्यकर्त्यांशी जवळून परिचय झाला. भाजपच्या मुंबईत झालेल्या पहिल्या अधिवेशनाला जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. मला स्वतःला अधिवेशनात जाता आले नाही तरी समारोपाच्या दिवशी संध्याकाळी शिवाजी पार्क वर झालेल्या श्रद्धेय अटलजींच्या विराट जाहीर सभेला मी माझ्या वडिलांसोबत हजर होतो ही अभिमानास्पद आठवण मन:पटला वर कायमची कोरली गेली आहे.
आज 42 वर्षांनंतर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीची गुणात्मक आणि संख्यात्मक वाढ झालेली दिसतेय, मात्र त्या साठी 1980 कालखंडात जुन्या लोकांनी,(या तील हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच लोक आता हयात आहेत) जे कष्ट घेतले, जो त्याग केला त्याचे स्मरण नव्या पिढीच्या मंडळींनी ठेवले पाहिजे हीच आजच्या भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने माफक अपेक्षा आहे.
– उदय भालेराव,
माजी नगरसेवक व माजी अध्यक्ष भा. ज. प. जळगाव शहर.